स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho ) या मालिकेतील प्रमुख पात्रांपैकी एक किरण माने (Kiran Mane) यांची मालिकेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. किरण माने यांची परखड राजकीय मतं याला कारणीभूत असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान किरण माने यांनी मीडीयाशी बोलताना आपल्याला मालिकेतून काढण्यात आले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यानंतर सोशल मीडीयामध्ये किरण माने यांच्या चाहत्यांनी #istandwith_KiranMane हा हॅशटॅग वापरत आपला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान शाहरूख खान यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट, राजकीय मतं मांडणं यावरून त्यांना अनेकदा कमेंट्स मध्ये शिव्यांची लाखोली वाहण्यात आली होती पण त्यांनाही किरण माने यांनी चोख प्रत्युत्तर दिली आहेत. त्यांनी मीडीयाशी बोलताना 'मला कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आलेला नाही. पण राजकीय पक्षाशी संबंधित अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले. मला बाकी काही म्हणायचं नाही पण ही झुंडशाही किती दिवस सहन करायची? ' असं म्हटलं आहे. तर सोशल मीडीयामध्ये त्यांनी फेसबूक पोस्ट करतही आपली बाजू मांडली आहे. हे देखील नक्की वाचा: साॅरी उद्धवजी.. मी किरण माने, मला तुमची माफी मागायचीय!, अभिनेत्याने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली.
किरण माने पोस्ट
दरम्यान किरण मानेंच्या समर्थनार्थ एनसीपीचे जितेंद्र आव्हाड आणि कॉंग्रेंसचे सचिन सावंत यांनी देखील ट्वीट केले आहे.
जितेंद्र आव्हाड
या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला.
याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
सचिन सावंत
पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2022
दरम्यान सोशल मीडियामध्ये अनेक मराठी पेजेस, अकाऊंट वरून किरण मानेंना सामान्यांनी आपला पाठिंबा दिला आहे. यावेळी काहींनी या प्रकारामुळे एक चांगला कलाकार कायमचा पडद्यामागे जाईल अशी चिंता बोलून दाखवली आहे तर काहींनी थेट स्टार प्रवाह वाहिनीवर बंदी घालण्याची मागणीही पोस्टवरुन केली आहे.