
अभिनेता किरण माने (Actor Kiran Mane) यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray) यांची जाहीर माफी मागितली आहे. माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून ही माफी मागितली आहे. कोरोना व्हायरस विरोधात राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना पाहून अभिनेता किरण माने प्रभावीत झाले आहेत. या प्रभावीत होण्यातूनच उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल या आधी व्यक्त केली गेलेली मतं आणि टीका याबाबत माने यांनी माफी मागितली आहे. या आधी भाजपसोबत सरकारमध्ये असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची होणारी अडचण, त्यातून होणारी राजकीय फरफट पाहून अनेकांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना दुबळी झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाठीला कणाच नाही, यांसारखी अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली जात असे. त्याबद्दलच किरण माने (Kiran Mane) यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे.
अभिनेता किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?
साॅरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय.
तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं.
आज तुम्ही मला खोटं ठरवलंत.
खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते... अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो !
ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात.
खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत 'फॅक्च्यूअल डेटा' देणं.. बोलताना 'अनावश्यक पाल्हाळ' आणि 'डायलाॅगबाजी' टाळणं... खरंच चकीत होतोय रोज ! (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सोशल मीडियावर सुपर हिट; निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड यावर होतीय चर्चा)
किरण माने फेसबुक पोस्ट
'लाॅकडाऊन'चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही... तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. 'टीझर-प्रोमो-अॅड-मार्केटिंग आणि मग पिच्चर' अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला !
कालच 'मास्क'स् चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं - विनाकारण बाहेर फिरणार्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं - माझं घर सातार्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी 'एफिशियन्सी' आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय.
कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !
धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे...मन:पूर्वक धन्यवाद !
- किरण माने.
दरम्यान, किरन माने यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरस झाली आहे. हजारो फेसबुक युजर्सनी ही पोस्ट लाईक केली आहे. तर हजारो लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फेसबुक पोस्ट खाली आलेल्या प्रतिक्रियाही शेकडो आहेत. या प्रतिक्रियांमधून अनेकांनी किरण माने यांचे आभार मानले आहेत. तर काहींनी माने यांच्या मताला सहमती दर्शवली आहे.