Lock Upp: भाजपला पाठींबा देणाऱ्या अभिनेत्री Payal Rohatgi ला माहित नाही भारताच्या राष्ट्रपतींचे नाव; सोशल मिडियावर ट्रोल
Payal Rohatgi | (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अनेक मुद्द्यांवर ती नेहमी भाष्य करत असते. पायलचे व्हिडीओ पाहिल्यावर एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे पायल भाजप पक्षाला पाठींबा देत आहे. पायल सध्या अभिनेत्री कंगना राणौतचा रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्ये (Lock Upp) दिसत आहे. अलीकडेच शोमध्ये ऑरेंज आणि ब्लू टीमला एक टास्क देण्यात आला होता, ज्यामध्ये स्पर्धकांचे सामान्य ज्ञान जाणून घ्यायचे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'लॉकअप'च्या अनेक स्पर्धकांमध्ये स्वतःला ‘जाणकार’ समजणाऱ्या पायलला भारताच्या राष्ट्रपतींचे नाव माहित नव्हते.

सध्या यामुळे पायल रोहतगी सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. 'लॉकअप' टास्क दरम्यान, स्पर्धकांना भारताच्या विद्यमान राष्ट्रपतींचे नाव विचारण्यात आले. सारा खान, निशा रावल, पूनम पांडे आणि पायल रोहतगी यापैकी कोणीही याचे उत्तर देऊ शकले नाही. याशिवाय पायल रोहतगीला आणखी एका प्रश्नाचे बरोबर उत्तर देता आले नाही. पायलला ट्विटरवर शब्द मर्यादा किती आहे असे विचारण्यात आले, ज्याचे तिने 140 असे उत्तर दिले. मात्र बरोबर उत्तर 280 होते.

पायल रोहतगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिचे राजकीय विचार शेअर करताना दिसते. त्याचबरोबर ती पंतप्रधान मोदींनाही खूप सपोर्ट करते, पण असे असूनही ती भारताच्या राष्ट्रपतींचे नाव सांगू शकली नाही. या कारणामुळे ती लोकांच्या निशाण्यावर आहे आणि ट्रोल होऊ लागली. वादामुळे पायल रोहतगीचे ट्विटर अकाउंट एका महिन्यात दोनदा सस्पेंड करण्यात आले आहे. (हेही वाचा: कपिल शर्मावर भडकले चाहते; मोठा स्टार नसल्याने 'द काश्मीर फाइल्स'च्या टीमला शोमध्ये बोलावण्यास नकार, दिग्दर्शक Vivek Agnihotri चा दावा)

दरम्यान, कंगना राणौतच्या ‘लॉकअप’ या नवीन शोमध्ये पहिला वीकेंड चांगलाच धमाकेदार होता. कंगनाने अनेक स्पर्धकांचे क्लासेस घेतले. लॉकअलच्या रविवारच्या एपिसोडमध्ये स्वामी चक्रपाणी महाराजांना निरोप देण्यात आला. स्वामीजी हे शो सोडणारे पहिले स्पर्धक आहेत. आता कंगना राणौतच्या तुरुंगात 12 स्पर्धक उरले आहेत.