KBC 13 (Photo Credit: File Image)

सोनी टीव्हीवरील (Sony TV) 'कौन बनेगा करोड़पति' (Kaun Banega Crorepati) हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोजपैकी एक आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सूत्रसंचालनामुळे तर या शोला ‘चार चांद’ लागतात. आता 'कौन बनेगा करोड़पति' च्या 13 व्या पर्वाची घोषणा झाली असून, पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हा शो होस्ट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना करोडपती बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सोनी टीव्हीने आज या शोच्या नोंदणीची तारीख जाहीर केली गेली आहे. 10 मे 2021 पासून शोच्या 13 व्या पर्वासाठी नोंदणी सुरु होईल.

सोनी वाहिनीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत, केबीसीच्या 13 व्या सीझनची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे - 'केबीसीचे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा श्री. अमिताभ बच्चन येत आहेत. म्हणून फोन उचला आणि सज्ज व्हा कारण 10 मे पासून केबीसी 13 ची नोंदणी सुरू होत आहेत.’ अशाप्रकारे या महामारीमध्ये पुन्हा एकदा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

केबीसी 13 च्या या प्रोमो व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन दिसून येत आहेत. ते म्हणतात, ‘कधी विचार केला आहे का, की तुम्ही व तुमची स्वप्ने यातील अंतर किती आहे?... तीन शब्दांचे... प्रयत्न! तर तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी फोन उचला आणि तयार राहा कारण येत आहे केबीसी 13.’

केबीसीमध्ये भाग घेण्यासाठी, तुम्हाला नोंदणीच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. अचूक उत्तरे दिलेल्या लोकांना शोची टीम संपर्क साधेल. त्यानंतर सामान्य ज्ञानाच्या आधारे लोक शॉर्टलिस्ट केली जातील. ही नोंदणी सोनालिव्ह अॅपद्वारे (SonyLiv App) होईल. आपण सोनीलिव्हच्या अधिकृत वेबसाइटवरून सोनीलिव्ह अॅप डाउनलोड करू शकता किंवा अ‍ॅप गूगल प्ले स्टोअ व एपल स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध आहे. (हेही वाचा: 'Khatron Ke Khiladi 11' मध्ये सहभागी होणार Rahul Vaidya; म्हणाला, पाणी, साप आणि उंचीची वाटते भीती)

दरम्यान, मागील वर्षी, 28 सप्टेंबर रोजी केबीसी 12 प्रसारित झाला होता. भोपाळची आरती जगताप या कार्यक्रमाची पहिली स्पर्धक होती. या खेळामध्ये कोरोनामुळे काही मनोरंजक बदल दिसले, ज्यात प्रेक्षकांनी पोल देण्याऐवजी व्हिडिओ-ए-फ्रेंड लाइफलाइन समाविष्ट करण्यात आली होती. 1 कोटी जिंकणारी नाझिया नाझीम ही केबीसी 12 ची प्रथम स्पर्धक होती. याचा अंतिम भाग 22 जानेवारी रोजी प्रसारित झाला.