देशातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss 13) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचे या शोचे 13 वे पर्व आहे. प्रत्येकवर्षी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे आणि सलमान खानच्या (Salman Khan) होस्टिंगमुळे हा शो प्रचंड लोकप्रिय ठरतो. यंदाच्या बिग बॉसचे स्वरूप पूर्णतः वेगळे असून, ते चाहत्यांना आवडत असल्याचे दिसत आहे. मात्र हा शो बंद करण्याची करणी सेनेने (Karni Sena) मागणी केली आहे. पद्मावत, मणिकर्णिका, आर्टिकल 15 नंतर आता करणी सेनेच्या रडारवर हा शो आहे. हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करत आहे असे करणी सेनेंचे म्हणणे आहे.
करणी सेनेचे पत्र -
करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने असा आरोप केला आहे की, बिग बॉस 13 मध्ये काश्मीरमधील मुलाबरोबर हिंदू मुली बेड शेअर करीत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे. यातून असा निष्कर्ष निघतो की हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात. अशा प्रकारे कलर्स वाहिनी आणि सलमान खान हिंदू संस्कृतीच्या चिंधड्या उडवत आहेत.
हिंदू संस्कृतीला काळिमा फासणारा हा शो बंद करण्यात यावा अशी मागणी करणी सेनेने केली आहे. दरम्यान याआधी पद्मावत चित्रपटावेळी करणी सेनेने अशीच भूमिका घेतली होती. प्रदर्शनापूर्वी चित्रपट आणि संजय लीला भन्साळी यांना फार नुकसान सोसावे लागले होते. आता बिग बॉसचे निर्माते काय निर्णय घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.