'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका अल्पावधीतच वादाच्या भोवऱ्यात; कथानकावर आक्षेप घेत पुजारी, ग्रामस्थांची मालिका बंद करण्याची मागणी
Dakhancha Raja Jotiba (PC - Twitter)

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर अलिकडेच सुरु झालेल्या 'दख्खनचा राजा जोतिबा' (Dakhancha Raja Jotiba) मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेवर जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला असून मालिका त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. यासाठी ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी मंदिरापुढे निदर्शने केली. तसंच मालिकेतील चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घेत मालिका बंद करण्याची मागणी करणारे निवेदन जोतिबाचे सरपंच राधा बुणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 'सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा,' असे निवेदनात म्हणण्यात आले आहे.

कोठारे व्हिजनची नवीकोरी मालिका 23 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेद्वारे जोतिबाचे माहात्म, इतिहास महाराष्ट्रातील घराघरांत पोहण्याचा उद्देश होता. मात्र मालिकेत अनेक चुकीच्या घटना दाखवल्याने भावना दुखावल्या गेल्याचे पुजाऱ्यांनी म्हटले आहे. उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मालिकेत दाखवली जाणारी चुकीची माहिती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे यांनी दिला आहे.

मालिकेत ज्योतिबाची भूमिका अभिनेता विशाल निकम साकारात असून बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचे बालपण पडद्यावर उभं करणार आहे. मालिकेच्या शुटींगसाठी कोल्हापूर मध्ये भव्यदिव्यं सेटही उभारण्यात आला आहे. तसंच कलाकारांची वेशभूषा, दागिने यावरही बारकाईने काम करण्यात आले आहे.(आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचे शीर्षकगीत, Watch Video)

यापूर्वी कोठारे व्हिजन्सने अनेक पौराणिक मालिकांची निर्मिती केली आहे. 'गणपती बाप्पा मोरया', 'विठू माऊली', 'जय मल्हार' या त्यापैकीच काही लोकप्रिय मालिका. त्यामुळे दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेकडूनही प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र सुरु झाल्यानंतर अल्पवधीतच मालिका वादात सापडल्याने निर्माते काय भूमिका घेतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.