अभिनेता Pearl Puri ला झटका; दुसऱ्यांदा नाकारला जामीन, अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आहे आरोप
Pearl V Puri (Photo Credits: Instagram)

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता पर्ल पुरीला (Pearl Puri) कोर्टाने दुसऱ्यांदा जामीन नाकारला आहे. पर्ल पुरीला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. 11 जून रोजी पर्लच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. अभिनेता मुंबईच्या ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आता पर्लच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होईल. पर्लवर वसई विरार पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 जून रोजी अटकेनंतर पर्ल पुरीला 5 जून रोजी वसई न्यायालयात हजर केले असता, तेथे त्याचा जामीन फेटाळण्यात आला आणि अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच दिवशी पर्ल पुरीने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. पर्ल पुरीच्या अटकेनंतर अनेक कलाकारांनी त्याच्या बाजूने समर्थन दिले आहे. यामध्ये एकता कपूर, निया शर्मा, अली गोनी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना आणि दिव्या खोसला कुमार, अनीता हसनंदानी या कलाकारांचा समावेश आहे. सर्वांचे म्हणणे आहे की, पर्लला खोट्या आरोपांमध्ये फसवले जात आहे.

आज पिडीत मुलीच्या वडिलांनी एक निवेदन जारी करत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र दुसरीकडे पिडीत मुलीच्या आईच्या म्हणणे आहे की, मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी मुलीचे वडील खोट बोलत आहेत. (हेही वाचा: Rhea Chakraborty च्या पदरी पडला बिग बजेट प्रोजेक्ट? महाभारतातील द्रौपदी साकारणार)

दरम्यान, पर्ल टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. पर्लला टीव्ही सीरियल नागीन 3 मधून प्रसिद्धी मिळाली. त्याने बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पर्लची गणना टीव्ही इंडस्ट्रीच्या चॉकलेट हिरोंमध्ये केली जाते. आता  बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर पर्लच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांच्या तपासणीनंतर काय सत्य समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.