Bigg Boss Marathi 2 | (Photo Credit: Twitter)

Bigg Boss Marathi 2: मराठीतील एका खासगी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरु असलेला बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 2) हा रिअॅलीटी शो लोकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. एकूण शंभर दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा काल (गुरुवार, 1 ऑगस्ट 2019) अडुसष्टावा दिवस होता. नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरु झाला. मात्र, या एपिसोडमध्ये या वाहीनीवर इतर वेळात दाखवल्या जाणाऱ्या मालिकांच्या प्रोमोज आणि रिकॅपचा इतका मारा करण्यात आला की, प्रेक्षकांवर गारद होण्याची वेळ आली. धक्कादायक म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये घेण्यात आलेली विश्रांती (ब्रेक) नेहमीच्या तुलनेत बरीच लांब होती. त्यामुळे काही प्रेक्षकांनी तर आपण बिग बॉसमध्ये मालिकांचे प्रोमो पाहतो आहोत की, मालिकांच्या प्रोमो मालिकेत बिग बॉस कार्यक्रम पाहतो आहोत हा गोंधळ उडल्याची भावना व्यक्त केली.

बिग बॉसच्या कार्यक्रमातील कालच्या भागात विश्रांतीदरम्यान, मालिकांचे प्रोमोज आणि रिकॅप यांचा भडीमार काहीसा अधिकच होता. अनेकदा तर असे निदर्शनास येत होते की, प्रोमोजच्या नावाखाली मालिकेच्या होऊन गेलेल्या भागातील पूर्व कथानकच (रिकॅप) दाखविण्याचा प्रयत्न झाला. यावर प्रेक्षकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. लेटेस्टलीने या प्रकारावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया प्रातिनिधीक रुपात जाणून घेतली.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

बिग बॉस संपला की काय?

बिग बॉस नियमीत पाहणारे डोंबिवली येथील एक प्रेक्षक विलास शिंदे यांनी सांगितले की, बिग बॉसच्या कालच्या भागात जाहिरातींसाठी 'टाईम सेट' केले नव्हते. त्यात दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोंचा तर इतका अतिरेक झाला की, एक क्षण असे वाटले की, बिग बॉस कार्यक्रम संपला की काय. दुसरे असे की, लक्ष्मी-नारायण विवाहाबद्दल जे प्रोमो दाखवले गेले त्यातही वेळेची संगती नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि मालिकेतील होऊन गेलेल्या भागातील प्रोमो दाखवण्यामागचा हेतूही स्पष्ट होत नव्हता. एकूणच प्रकारामुळे बिग बॉस कार्यक्रम पाहताना माझा रसभंग झाला, असेही शिंदे म्हणाले.

आमचा रसभंग झाला

बिग बॉस नियमीत पाहणाऱ्या आणखी एक प्रेक्षक रुचीरा रोहन गायकर म्हणाल्या की, माझ्यासह आमच्या घरातील सर्वचजण बिग बॉस पाहतात. नेहमीप्रमाणे काल बिग बॉस पाहात असताना घेतलेला ब्रेक आणि दाखवले गेलेले प्रोमो वेळखाऊ होतो. अधिक वेळ प्रोमो सुरु असल्यामुळे आमच्या घरातील वृद्ध लोकांचा संभ्रम झाला की, बिग बॉस कार्यक्रम संपला की काय. कोणतीही कल्पना न देताना ब्रेकदरम्यान दीर्घकाळ प्रोमो दाखवल्यामुळे आमचा रसभंग झाला. मनोरंजनातील आमच्या आनंदात व्यत्यय आला. (हेही वाचा, रात्रीस खेळ चाले 2: घुंगरांच्या तालावर शेवंताच्या मोहक अदा; अण्णांची प्रतिक्रिया पाहून तुम्हीही चक्रवाल (Watch Video))

हे तर संतापजनक

सायली सावंत या लोअर परेल येथील बिग बॉस प्रेक्षक म्हणाल्या की, बिग बॉस कार्यक्रमादरम्यान नेहमी जाहीराती असतात. त्यासाठी ब्रेक घेणे ठिक आहे. मात्र, इतका प्रदीर्घ काळ ब्रेक घेणं आणि त्यात मालिकांचे प्रोमो दाखवणे हे संतापजनक आहे. बिग बॉसचा कार्यक्रम सुरु असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर इतर मालिकांच्या प्रोमोंचा भडीमार प्रेक्षकांनी का सहन करायचा असा सवालही सायली सावंत यांनी विचारला.

बिग बॉसमध्ये मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचे दर्शन

बिग बॉस हा कार्यक्रम मानवी व्यवहार आणि मानवी वर्तन यांचे विविध पैलू दाखवतो. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक सदस्य हे समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले असतात. तसेच, त्यांनी आपापल्या क्षेत्रात लोकचर्चेस पात्र ठरेल अशी कामगिरी केलेली असते. अनेकदा ही कामगिरी सकारात्मक किंवा टीकात्मकही असू शकते. तसेच, या कार्यक्रमातील स्पर्धकांना आपल्या करीअरचा आलेख विस्तारण्यसाठीही त्याचा फायदा होतो. विविध परिस्थितीमध्ये व्यक्ती कसे वर्तन करु शकते हे या कार्यक्रमातून समजण्यास मदत होते. तसेच, मनोरंजही होते. यासाठी प्रेक्षक हा कार्यक्रम पाहात असतात. कार्यक्रम प्रसारीत होत असताना जाहिरातींसाठी एक अल्पशी विश्रांती घेतली जाते. मात्र , कार्यक्रमाच्या कालच्या भागात ही विश्रांती अधिक मोठ्या प्रमाणावर होती.