
बिग बॉसचा (Bigg Boss Marathi 2) खेळ आता शेवटच्या टप्प्यात पोहचल्याने प्रत्येक खेळाडू स्पर्धक हा आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. अशातच कित्येकदा भान सोडून वागल्याने घरात भांडण झालेलं आपण पाहिलं आहे. असाच काहीसा प्रकार आजही घडला, आज घरात सुरुवातीपासून आरोह आणि वीणा मध्ये जणू काही खडाजंगी सुरू होती. या वादात शिवानीने देखील उडी घेत वीणाला बोल लावले. हा वाद संपतो तोवरच बिग बॉस या आठवड्याच्या कॅप्टनशिप टास्कची घोषणा करतात. या टास्क दरम्यान शिव आरोह ला चावल्याने त्यांच्यात पुन्हा वॉर होतो. या भांडणात शिवने बळाचा वापर केल्याने बिग बॉस त्याला कॅप्टन टास्क मधून अपात्र ठरवतात ज्यामुळे किशोरी थेट घराच्या कॅप्टन बनतात.
आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आरोहने स्वतःची अंतर्वस्त्रे वीणाच्या कपड्यांमध्ये धुवायला टाकल्याने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होते पण हा वाद वाढत जाऊन अगदी टोकाला पोहचतो. दरम्यान आज घरात कॅप्टन शिप टास्क पार पडणार असतो. बिग बॉसने दिलेल्या सूचनेनुसार किशोरी आणि शिव यांच्या समर्थकांच्या दोन टीम पाडल्या जातात. या टीम ना 'म्हातारीचा बूट' हे कार्य सोपवण्यात येते. यामध्ये शिव हा आरोहला चावल्याने त्यांच्यात कडाक्याचे भांडण होते. आश्चर्य म्हणजे यात वीणा सुद्धा शिवची बाजू घेत नाही त्यामुळे नाराज होऊन शिव रडू लागतो.अखेरीस वीणाने त्याची समजूत काढल्यावर तो आरोहची सुद्धा माफी मागतो.
दरम्यान, स्पर्धकांची जरी एकमेकात समजूत घालून झाली असली तरी म्हातारीचा बूट या टास्क मध्ये हिंसेचा वापर झाल्याने बिग बॉस स्वतः हा टास्क बरखास्त करतात.यात शिवला हिंसेसाठी नॉमिनेशनची शिक्षा दिली जाते तर किशोरी या घराच्या नवीन कॅप्टन बनतात.
यापाठोपाठच बिग बॉस सदस्यांवर नॉमिनेशन टास्क सोपवतात. यात प्रत्येक सदस्याला स्वतःसोबत अन्य दोन स्पर्धकांना मेडल देत सुरक्षित करायचे असते. यामध्ये सर्वात कमी वोट मिळवून हीना नॉमीनेट होते तर बिचुकले यांना घरात पुनर्वापसी नंतर अद्याप सदस्यत्व मिळाले नसल्याने त्यांना या कार्यापासून दूर ठेवण्यात येते. एपिसोड शेवटी उद्याच्या भागाची झलक दाखवताना उद्या घरात मेघा धाडे ,रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार यांची एंट्री होणार आहे, त्यामुळे उद्या काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला मराठी बिग बॉस 2!