एपिसोडची सुरुवार शिवानीने माधवला समजावण्यापासून होते. माधव ज्या प्रकारे नेहाशी बोलला आहे त्याबद्दल शिवानी त्याला त्याचा राग विसरण्याबद्दल सांगते. दुसरीकडे नेहा सर्वजण आपल्या चूकाच सांगत आहे या कारणावरून रडायला सुरुवात करते. इथे सर्वात मोठी समस्या आहे ती नेहाच्या चेहऱ्यावरील भावांची आणि तिच्या टोनची. शिवानी माधव एकत्र बसून नेहा कशी आणि कुठे चुकीचे आहे हे समजावून सांगतात. मात्र ही शाब्दिक चकमक बाचाबाचीमध्ये रुपांतरीत होते. शेवटी एकमेकांच्या चुका दाखवल्यावर नेहा जे करत आहे तो तिझा ‘गेम’ असे शिवानी म्हणते. नेहाला ही गोष्ट खूप लागते व ती शिवानीच्या या वाक्यामुळे झालेले दुःख आपले वडील गेल्याच्या दुःखापेक्षा मोठे आहे असे म्हणते.
त्यानंतर महेश मांजरेकर यांची एन्ट्री होते. आल्यानंतर सर्वांना घरातील आपले दोन मित्र कोण आहेत हे विचारले जाते. त्यानंतर माधव नेहाशी ज्या प्रकारे वागत आहे, ज्याप्रकारे तो तिला बोलत आहे त्याबाबत त्याला विचारले जाते. त्यावर माधव स्वतःचे स्पष्टीकरण देतो आणि त्याला नेहाही समर्थन देते. यामध्ये शिवानीही मधे पडून घडत असलेल्या रुसव्या फुगव्यांबद्दल आपले मत व्यक्त करते. (हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर हे लोक इथे नक्की बिग बॉस खेळायला आले आहेत का? असा प्रश्न पडतो). हे पुराण संपल्यावर शिवला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले जाते.
त्यानंतर हीनाच्या ज्या सवयीबद्दल सर्वजण त्रासलेले आहेत त्याबद्दल तिला समजावून सांगितले जाते. ती एखादी गोष्ट सांगताना ज्या प्रकारे खूप वेळ समजावत राहते त्यामुळे समोरचा बोअर होते. अशा गोष्टी हीनाने करू नये असे तिला सांगितले जाते. पुढे विषय जातो तो गाजलेल्या शिव आणि आरोहच्या भांडणावर. आरोह पक्का पुणेकर असल्याने या भांडणाबद्दल त्याच्याकडे अतिशय योग्य स्पष्टीकरण होते. मात्र शिव ज्या प्रकारे मुद्दे मांडत होता ते पाहून त्याच्या स्वतःच्या बुद्धीची कुवत दिसून येते. रुपालीच्या आग लावण्याने, या भांडणावेळी शिवचा गैरसमज झाला होता. मात्र त्यातून जे घडले त्याबद्दल आरोह आणि शिव एकमेकांना सॉरी म्हणतात. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश?)
त्यानंतर मुद्दा निघतो तो शिवानी आणि हीना यांच्या भांडणाचा. हीनाच्या एका छोट्या प्रश्नामुळे शिवानी तिला खूप बोलली होती त्याबद्दल तिला चार गोष्टी सुनावल्या जातात. बरेचवेळा शिवानी स्वतः म्हणते की वैयक्तिक गोष्टीवर बोलू नका, मात्र ती स्वतः अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करते. गेल्या आठवड्यात शिवानीच्या तोंडाचा पट्टा खूपच चालला होता, त्याबद्दल तिला समाज दिली जाते. या सर्व प्रकरणात रुपालीदेखील हीनाच्या विरोधात होती म्हणून तिलाही तिची चूक दाखवली जाते. शेवटी नॉमिनेट असलेल्या वीणा आणि हीना या दोघींपैकी कोण सेफ असेल असा प्रश्न विचारला जातो, त्यावर सर्वजण वीणा सेफ असेल असे उत्तर देतात. मात्र अखेर हीना या आठवड्यासाठी सुरक्षित होते.