Amrita Pandey (PC - Instagram)

Amrita Pandey Dies: भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे (Amrita Pandey) चा मृत्यू झाला आहे. आदमपूर परिसरातील दिव्या धाम अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 104 मध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला चौकशीसाठी पाचारण केले. पथकाने येऊन सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता सकाळी 10:15 वाजता अमृताने तिच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकल्याचे आढळून आले. त्यावर तिने लिहिले होते की, 'क्यों दो नाव पर सवार थी उसकी जिंदगी, हमने नाव डूबाकर उसका सफर आसान कर दिया।' (हेही वाचा - Gurucharan Singh Missing: 'तारक मेहता...'फेम अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले)

या स्टेटसवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संपूर्ण हायप्रोफाईल प्रकरणाची पोलीस उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे शहर एसपी श्री राज यांनी सांगितले. या संदर्भात एसपी आनंद कुमार यांच्या सूचनेनुसार एक टीम तयार करण्यात आली आहे. कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

अमृताचा विवाह 2022 मध्ये छत्तीसगडमधील बिलासपूर येथील चंद्रमणी झांगडे याच्याशी झाला होता. तो ॲनिमेशनमध्ये काम करायचा. लग्नानंतर दोघेही मुंबईत राहत होते. 12 एप्रिल रोजी ती मोठी बहीण वीणा पांडेच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. 18 एप्रिल रोजी लग्नानंतर ती भागलपूरमध्ये राहिली. पण, तिचा नवरा मुंबईला परतला. शनिवारी अमृता उशिरा उठली. सगळं नॉर्मल होतं. तिने सोशल मीडियावर स्टेटसही पोस्ट केले. त्यानंतर तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ती डिप्रेशनमध्ये होती, असे कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

अभिनेत्रीवर उपचारही सुरू होते. ती खूप काळजीत होती. याला कंटाळून तिने आत्महत्या केली. अमृता पांडेने सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते खेसारी लाल यादवसोबत दीवानापन या चित्रपटात काम केले होते.