'एक महानायक- डॉ बी.आर.आंबेडकर' मालिकेतील अभिनेता जगन्नाथ निवंगुणे यांना करोना विषाणूची लागण; ताबडतोब थांबवले शुटींग
Jagannath Nivangune (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राज्यात चित्रपट व मालिकांच्या शुटींगसाठी (Shooting) परवानगी दिली होती. सध्या शासकीय नियमाचे पालन करून अनेक सिरिअल्सचे शुटींग सुरु झाले आहे. अशात टीवी शो 'एक महानायक- डॉ बी.आर. आंबेडकर' (Ek Mahanayak Dr BR Ambedkar) या मालिकेतील एका कलाकाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर ताबडतोब या मालिकेचे शुटींग थांबवण्यात आले आहे. या मालिकेतील कलाकार जगन्नाथ निवंगुणे (Jagannath Nivangune) यांना करोनाची लागण झाली आहे, ते या मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका सकारात आहेत.

अँड टीव्हीवर (And TV) प्रसारित होणाऱ्या या हिंदी मालिकेचे शुटींग गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये सुरु आहे. निवंगुणे यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्यांनी कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती त्यामुळे त्यांच्या कोरोनाबद्दल कोणालाही काही जाणवले नाही. जगन्नाथ निवंगुणे सध्या वरळी इथे उपचार घेत असून ते सुखरूप आहेत. एबीपीमाझाच्या वृत्तानुसार, अभिनेते निवंगुणे आपल्या गाडीने सेटवर येतात, पूर्णतः दक्षता घेऊन ते चित्रीकरण करतात, जास्त लोकांच्या संपर्कात येऊ नये असा त्यांचा अट्टाहास असतो, मात्र आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वजण बुचकाळ्यात पडले आहेत. (हेही वाचा: ईशा केसकर ने सांगितलं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून बाहेर पडण्याचं कारण (Watch Video))

दुसरीकडे, टीव्ही शो ‘मेरे साई’च्या सेटवर देखील क्रू मेंबरला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर शुटींगला ब्रेक लावण्यात आला होता. आता आज तीन दिवसांनतर या मालिकेचे शुटींग पुन्हा सुरु झाले आहे. 'मेरे साई' चा सेट नायगाव येथे आहे. निर्मात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती क्रिएटिव्ह टीमचा एक भाग होता. काही दिवसांपूर्वी तो सेटवर हजर होता आणि आजारी पडल्यापासून त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही.