यंदाचे वर्ष कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) थोडेसे त्रासदायक जरी असले तरीही यंदा लोकांना त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीजच्या अनेक गोड बातम्या मिळत आहे. कुणाचे लग्न, कुणाचा साखरपुडा तर कुणाच्या घरी छोट्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी. यामुळे त्यांचे चाहतेही आनंदून गेले आहेत. मराठी कलाकारांचाही लग्न, साखरपुडा यांचा सपाटा सुरुच आहे. सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा, शर्मिष्ठा राऊतचे लग्न या गोड बातम्या चाहत्यांना मिळतो न मिळतोच तोच आणखी एक सुखद धक्का चाहत्यांना मिळाला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'खुलता कळी खुलेना' फेम अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याची तयारीत आहे. नुकताच तिचा साखरपुडा (Engagement) झाला असून तिने या सोहळ्याचे सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
अभिज्ञा काही महिन्यांपूर्वी आपण मेहुल पै (Mehul Pai) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. मात्र तिने अष्टमी दिवशी मेहुल पै सोबत साखरपुडा केला असून या सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. Sharmishta Raut Wedding: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत-तेजस देसाई यांची अशी जुळून आली रेशीमगाठ; घरातील 'या' व्यक्तीने घडवली दोघांची भेट!
पाहा फोटोज:
अभिज्ञा भावे हिचा होणारा नवरा मेहुल पै हा मूळचा मुंबईचा असून 'क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर अभिज्ञा अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्याआधी हवाई सुंदरी होती. त्यानंतर तिने हिंदी मालिका ‘प्यार की एक कहानी’द्वारे मालिका विश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिची झी मराठी वरील 'खुलता कळी खुलेना' या मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. सध्या अभिज्ञा स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम करत आहे. नुकतीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली असून यात ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.