Water Cup 2019 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे आमिर खान याने मानले आभार
Toofan Aalaya (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच उद्देशाने 2016 साली पाणी फाऊंडेशनची सुरुवात झाली. पाणी फाऊंडेशन द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली. या चळवळीला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान Aamir Khan) आणि पत्नी किरण राव (Kiran Rao) यांच्या रुपाने चेहरा प्राप्त झाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या दोघांनीही पाणी फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमात मोलाचे कार्य केले. गेल्या 3 वर्षात सामान्यांपासून अगदी सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण या चळवळीशी जोडले गेले.

पाणी फाऊंडेशन द्वारे महाराष्ट्रभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा झी मराठीवरील 'तुफान आलंया' या कार्यक्रमात घेतला जातो. 1 मे पासून सुरु करण्यात आलेल्या 'तुफान आलंया' या कार्यक्रमाची अलिकडेच सांगता झाली. याच निमित्ताने परफेक्शनिस्ट आमिर खान याने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप 2019 मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. या संदर्भातील ट्विट करत आमिर याने लिहिले की, "हा तुफान आलंया कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड. या संघर्षात, परिश्रमात सहभागी झालेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद."

आमिर खान याचे ट्विट:

'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेने पहिल्या वर्षी 3 तालुक्यात, दुसऱ्या वर्षी 30 तालुक्यात तर तिसऱ्या वर्षी 75 तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष असून या चळवळीने यंदा महाराष्ट्रातील 76 तालुके व्यापले आहेत.