Swarajyarakshak Sambhaji : शिक्षेची अंमलबजावणी; जनार्दनपंतांचे डोळे काढून वासोट्याच्या किल्ल्यावर रवानगी
जनार्दनपंत (Photo credit : Youtube)

परवाच्या (15 जानेवारी) भागात संभाजी महाराजांनी कारभाऱ्यांना दिलेले मृत्यूचे संकेत, सोयराबाईंची घालमेल, राणूबाईंचा राग आपण पाहिलात. आता कालच्या (16 जानेवारी) भागाची सुरुवात तुरुंगातून होते, जिथे जनार्दनपंत रामरक्षा म्हणत आहेत. अनाजी पंतांच्या नादाला लागून आपण फसलो असल्याचे जनार्दन पंत म्हणतात. अनाजी पंतांनी ते नेमके काय करत आहेत याचा आम्हास थांगपत्ता लागू दिला नाही, आम्हाला अर्धवट माहिती दिली असे इतर कारभाऱ्यांचेही म्हणणे असते. मात्र अनाजी आणि सोमाजी स्वार्थासाठी तुम्हीही यात स्वखुशीने सामील झालात असे प्रत्युतर देतात.

इकडे पुतळाबाईसाहेब शंभूराजांना हातावर दही साखर देत आहेत. घरच्यांसोबत लढणे हे फार कठीण, आता तुमची खरी कसोटी आहे, तेव्हा जे काही कराल तेव्हा महाराजांना आठवा असे त्या सांगतात. शंभूराजे त्यांचा चरणस्पर्श घेऊन तिथून बाहेर पडतात. परत तुरुंगात कारभाऱ्यांची शाब्दिक चकमक सुरु होते. कबुली जबाब देऊ, माफी मागू असे अनाजी आणि सोमाजीसोडून इतरांचे म्हणणे असते. मात्र शंभूराजेंनी काल जे मृत्यूचे वर्णन केले तो त्यांचा आपल्यामध्ये फुट पाडण्याचा डाव होते हे अनाजी पंत समजावून सांगतात. इतक्यात कवी कलश जनार्दनपंतांना घेवून जायला येतात. पंत ‘मी एकटा नाही जाणार’ अशी याचना करतात. मात्र यावेळी पंतांना कोणीही साथ देत नाही.

सोयराबाईसाहेबांना जनार्दनपंतांचे ओरडणे ऐकू जाते, त्या घाबऱ्या होऊन काय गडबड चालली आहे ते विचारतात. त्यावेळी त्यांना जनार्दन पंतांचे डोळे फोडून त्यांना वासोट्याच्या किल्ल्यावर डांबून ठेवण्याची शिक्षा झाली असल्याची माहिती मिळते. कवी कलशांना पंत सोडण्याची विनंती करतात, मात्र एका जबाबदार कारभाऱ्याने युवराजांच्या विरुद्ध चाललेल्या कटात सामील होणे ही फार मोठी चूक आहे, त्यामुळे आता सुटका नाही असे कविराज सांगतात. दरम्यान पंतांचे डोळे फोडण्यासाठी तयार केली जाणारी सळी इतर कारभारी पाहतात, त्यावेळी सरनोबत त्यांना आता केल्याची फळे भोगा असा टोमणा मारतात.

भीतीने कासावीस झालेले पंत कलशांच्या पाया पडतात, ओरडतात, याचना करतात. मात्र शेवटी जनार्दन पंतांचे डोळे काढले जातात. हंबीरराव इतर कारभाऱ्यांना घेऊन सदरेवर येतात आणि जनार्दन पंतांची किंकाळी सर्वांच्या कानाचे पडदे भेदून आता शिरते. दरम्यान पुतळाबाईसाहेब सोयराबाईंच्या महाली येतात. घाबरलेल्या, कासावीस झालेल्या सोयराबाई या धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करतात. मात्र पंतांनी पन्हाळगडावरचे खलिते लपवले आणि ते शंभूराजेंच्या मर्जीतून उतरले असे पुतळाबाई साहेब सांगतात. तसेच पंतांच्या डोळे जाण्याने फितुरांना दूरदृष्टी येईल असेही त्या म्हणतात.

इकडे सदरेवर हिरोजी आणि आवजी शंभूराजेंकडे अभय देण्याची मागणी करतात. मात्र स्वराज्यात चुकीला अभय नाही, विनाकारण माफी नाही असे शंभूराजे ठणकावून सांगतात. हे पाहून आपली काही खैर नाही हे लक्षात आलेले हिरोजी आणि आवजी शेवटी सगळे काही खरे खरे सांगण्याची तयारी दर्शवतात.