ट्राफिकला कंटाळून सोनाली कुलकर्णीने केला मेट्रोने प्रवास; असा होता तिचा पहिलावहिला अनुभव
सोनाली कुलकर्णी (Pic Credit: Yogen Shah)

सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलविषयी सर्वसामान्यांना फारच उत्सुकता आणि कौतुक असते. त्यांचे कपडे, मेकअप यांपासून ते त्यांच्या गाड्या या सर्वांशी तुलना करीत, त्यांचे जीवन हे आपल्यापासून किती वेगळे आहे याच्या बाता मारल्या जातात. काही अंशी ते खरेही आहे. एक सेलिब्रिटी असल्याने साहजिकच त्यांंच्यावर काही बंधने येतात. मात्र ती सुद्धा आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे, आणि वेळ प्रसंगी ते एका सामान्य मनुष्याप्रमाणे वागू शकतात. याच गोष्टीचे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचावे म्हणून चक्क मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. या घटनेचे फोटो सोनालीने सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. (हेही वाचा : Big B यांचा खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीतून प्रवास)

तर सोनाली कुलकर्णीला मुंबई मेट्रोचा अनुभव घ्यायचा होता. मात्र ती एक सेलिब्रिटी असल्याने ती थेट गर्दीत जाऊ शकत नव्हती. मात्र काल कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होत असल्याने तिने मेट्रोचा आधार घेतला. मुंबईतील अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीत सोनाली अडकली. वर्सोवा इथे शुटिंग स्थळी पोहचण्यासाठी या वाहतूक कोंडीमुळे सोनालीला उशीर होत होता. त्यामुळे वेळ वाया न घालवता तिने अंधेरी मेट्रो स्थानकातून मेट्रोने वर्सोवा इथे जाण्याचा निर्णय घेतला. सोनालीची फोटो पाहून तिचा हा पहिला वाहिला मेट्रो अनुभव अतिशय संस्मरणीय ठरला असल्याचे जाणवते.