रणवीरचा दमदार अभिनय, सिद्धार्थची एनर्जी आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन म्हणजे पैसा वसूल 'Simmba' !
रणवीर सिंग, सिद्धार्थ जाधव आणि रोहित शेट्टी (संग्रहित - संपादित प्रतिमा )

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यानंतर विनोदाला एका नवा ढंगात सादर करणारा, अवलिया कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav). मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर; जत्रा, दे धक्का, बकुळा नामदेव घोटाळे, हुप्पा हुय्या, इरादा पक्का अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये सिद्धार्थ झळकला. आवडत्या भूमिकांना न्याय देण्याचे त्याचे कसब त्याला एक यशस्वी अभिनेता होण्यासाठी कारणीभूत ठरले. म्हणूनच मराठीसोबत हिंदीमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिटी ऑफ गोल्ड्स हे त्याचे काही गाजलेले हिंदी चित्रपट. आता सिद्धार्थ जाधव रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या सिंबा (Simmba) या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारत आहे.

रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ जाधव यांचा स्नेह फार जुना आहे. अशा या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्याला आपल्या चित्रपटात घेण्याचा मोह कोणाला होणार होणार नाही? याचीच परिणती सिंबा चित्रपटात झाली. या चित्रपटात सिद्धार्थ पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे. नुकतेच सिद्धार्थ जाधव याने लेटेस्टीच्या ऑफिसला भेट दिली, आणि ‘सिंबा’ हा चित्रपट नेमका काय आहे, हे नाव कसे आले, इथपासून ते त्याची भूमिका, रोहित शेट्टी यांच्यासोबत असेलेली त्याची मैत्री, सेटवर केलेली धमाल, इतक्या मोठ्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अशा सर्व गोष्टींवर मनमोकळेपणाने चर्चा केली. पहा काय म्हणाला आहे सिद्धार्थ जाधव -

‘सिंबा’ हा रोहित शेट्टी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून, हा चित्रपट तेलगू सिनेमा Temper च्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सचा रिमेक आहे. या चित्रपटासाठी रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शकासोबतच निर्मात्याचीही भूमिका पार पाडली आहे. वकंथम वम्शी (Vakkantham Vamsi) यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर तनिष्क बागची (Tanishk Bagchi) यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मते हा चित्रपट अगदी पैसा वसून चित्रपट आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाचे, रणवीरच्या अभिनयाचे तर सिद्धार्थच्या एनर्जीचे चहूकडून कौतुक होत आहे.