Hirkani Poster (Photo Credits: File Image)

सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणी (Hirkani). याच शूर आईची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली चित्रपटाच्या teaser मधून . याच माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत आता प्रेक्षकांची ओळख होणार आहे. ती व्यक्ती म्हणजे ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय.

हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. ‘हिरकणी’ चित्रपटात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

नुकतेच, या चित्रपटातील सोनाली आणि अमित या नव्या जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारित गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचे बोल संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहेत. अगदी सहज-सोप्या शब्दरचनेने देखील प्रेम गीत तयार होऊ शकते आणि ते इतरांना देखील या गाण्याच्या प्रेमात पाडू शकते अशा प्रकारे हे गाणे बनले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ या सुरेल प्रेम गीताला अमितराज यांनी संगीतही दिले आहे आणि त्यांनी हे गाणं गायले देखील आहे, तसेच गायिका मधुरा कुंभार यांनी अमितराज यांना गाण्यात साथ दिली आहे.

या गाण्याशी संबंधित आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) हे गाणं ट्विटरवरुन रिलीझ केले आणि त्याने हिरकणी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा ही दिल्या.

शिवराज्याभिषेक गीत, मोशन पोस्टर, टीझर अशा विविध माध्यमांतून हिरकणी चित्रपटाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि आता हिरा-जीवाचं प्रेम गीत ‘जगनं हे न्यारं झालं जी’ प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची भावना जागवण्यासाठी सज्ज झाले आहे.

नक्की वाचा: Hirkani Teaser: बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या 'हिरकणी'च्या थक्क करणाऱ्या प्रवासाची शौर्यगाथा

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ चित्रपट येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.