Vikram Gokhale (Pic Credit - ANI)

Vikram Gokhale Passes Away: ज्येष्ठ टीव्ही आणि चित्रपट अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Passes Away) यांचे  पुणे येथे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गोखले यांची प्रकृती अचानक खालावल्याने पाठिमागील 15 दिवसांपूर्वी त्यांना पुणे (Pune) येथील दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती हळूहळू अधिकच चिंताजनक बनत चालली होती. त्यांच्यावर आज संध्याकाळी 6 वाजता वैकुंठ स्मशान भुमित अंत्यसंस्कार आहेत

विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात 1990 मध्ये अमिताभ बच्चन स्टारर "अग्निपथ" आणि सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत "हम दिल दे चुके सनम" (1999) आदी चित्रपटांचा समावेश आहे. नुकताच त्यांचा 'गोदावरी' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. जो सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. (हेही वाचा, ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचा नवा चित्रपट; स्वतः केले लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा समावेश)

विक्रम गोखले यांना 2010 मध्ये, त्यांना अनुमती या मराठी चित्रपटातील कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आघात या मराठी चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनातही पदार्पण केले. अभिनेत्याच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये मिशन मंगल, हिचकी, अय्यारी, बँग बँग, दे दना दान आणि भूल भुलैया यांचा समावेश आहे.

विक्रम गोखले हे टीव्ही मालिकांमधूनही घरोघरी पोहोचले होते. सध्या ते ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत भूमिकासाकारत होते. ‘अग्निहोत्र’ या काही वर्षांपूर्वी आलेल्या मालिकेतूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्रीची भूमिका प्रचंड गाजली.

ट्विट

दरम्यान, विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे जीवनगौरव (2015), हरिभाऊ साने जीवनौरव (2017), पुलोत्सव सन्मानाने (2018) आदी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते. त्याच्याही आगोदर काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी मधल्या काळात घेतलेल्या काही राजकीय भूमिकांमुळे आणि वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. गोखले यांनी त्या वेळी केलेल्या वक्तव्यावरुन वादही निर्माण झाला होता.