‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करून, विविधांगी भूमिकांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे जेष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे आज, 2 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. रमेश देव यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या 3 दिवसांपूर्वी रमेश देव यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा देव, अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव असे पुत्र, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी अमरावती येथे झाला. त्यांची चित्रपटसृष्टीमधील कारकीर्द फार मोठी आहे. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि 250 हून अधिक जाहिरातींची निर्मिती केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
रमेश देव यांनी साधारण 1950 मध्ये खलनायक म्हणून आपले करियर सुरु केले. त्यांनी सुरुवातीला छोटे छोटे पात्र पडद्यावर साकारले. पुढे रमेश देव यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळत गेल्या. आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. राजश्री प्रॉडक्शनचा आरती (1962) हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. आनंद चित्रपटामधील त्यांची भूमिका खास गाजली होती. (हेही वाचा: अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
रमेश देव आणि सीमा देव ही त्या काळातली हिट अशी जोडी होती. हे दोघे चित्रपटामध्ये असतील तर चित्रपट गाजणार असे भाकीत वर्तवले जायचे. सीमा देव यांनी 1960 मध्ये जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. याच चित्रपटात रमेश देव यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. या जोडीमुळे जागाच्या पाठीवर चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.