टॉल, डार्क अँड हँडसम लूकने आजही तरुणींच्या ह्रदयावर राज्य करणारा समीर धर्माधिकारी ( Sameer Dharmadhikari ) ‘वाजवुया बँड बाजा’ ( Vajvuya Band Baja) या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात समीर पहिल्यांदाच एका विनोदी अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. समीर व्यतिरिक्त अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) हेदेखील या चित्रपटात लग्नाळू तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘वाजवुया बँड बाजा’ या चित्रपटाच्या निमित्ताने समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाई हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या दोघांची धमाल पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
लक्ष्मण एकनाथराव कागणे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात संदीप आणि अमित या दोन भावांच्या लव्हस्टोरीचा धुमधडाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समीर धर्माधिकारी यांनी वठवलेला संदीप हा एक शिक्षक आहे. समाजात चांगले विद्यार्थी घडवणं हे आपलं आद्य कर्तव्य मानणाऱ्या संदीपच्या आयुष्यात आई आणि आपल्या बालमैत्रिणी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रियांना प्रवेश नाही. तर मंगेश देसाईंनी साकारलेला अमित हा गावातला एकुलता एक कंपाउंडर कम डॉक्टर आहे. ज्या डॉक्टरकडे अमित प्रॅक्टिस करत आहे, त्याच डॉक्टरच्या मुलीच्या प्रेमात तो घायाळ झाला आहे. संदीप आपल्या बालमैत्रिणीसमोर आपल्या प्रेमाची ग्वाही देतो का? अमितच्या प्रेमाची साक्ष डॉक्टरच्या मुलीला पटते का? पर्यायने संदीप आणि अमित या दोघा भावांचे प्रेम यशस्वी होते का? या प्रश्नांची मजेशीर उकल पाहण्याकरिता 'वाजवुया बँड बाजा' पाहिल्यावर मिळणार आहेत.
हेही वाचा - 'फत्तेशिकस्त' सिनेमाचं पहिलं पोस्टर; उलगडणार शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची कहाणी
'वाजवुया बँड बाजा’ या चित्रपटाची कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे. तसेच निशांत नाथराम धापसे यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे, अशी इतर श्रेयनामावली आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपलं प्रेम यशस्वी होणार का? या सर्वसामान्य प्रश्नाची धाकधूक असते. 'वाजवुया बँड बाजा' त्यावर जरा गंमतीशीर पद्धतीने भाष्य करतो. हा चित्रपट तरुणांना नक्कीच भावेल, अशी निर्माते-दिग्दर्शकांना आशा आहे.