मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही- मनसे अध्यक्ष राज ठाकरे
MNS Chief Raj thackeray Zoom Meeting (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर लक्षात घेता 'ब्रेक द चेन' या अभियानाअंतर्गत राज्यात मालिका वा चित्रपटांच्या चित्रिकरणाला बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान गेल्या वर्षी यंदाही चित्रिकरण बंद झाल्याने नुकसान होऊ नये म्हणजे निर्मात्यांनी परराज्यांत जाऊन चित्रिकरण सुरु केले आहे. दरम्यान अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांचे परराज्यात गेल्या महिन्याभरापासून शूटिंग सुरु आहे. मात्र आपल्या राज्यात मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण सुरु करण्यास काही हरकत नाही असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या झूम बैठकीत राज यांनी अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांसोबत यावर चर्चा केली.

या झूम बैठकीला उपस्थितांचे मुद्दे, त्यांचे सल्ले ऐकून घेण्यात आले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मराठी चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या 50 पेक्षा जास्त मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला.हेदेखील वाचा- शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर हिने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना दिले बळ, भगवदगीतेमधील काही ओळींची करुन दिली आठवण

जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेनंतर बायोबबल प्रणालीनुसार परराज्यात जर काम होतं तर महाराष्ट्रातही होऊ शकेल असं मत यावेळी मांडण्यात आलं. शिवाय, लोककलावंतांना आर्थिक पॅकेज मिळावं, थिएटर्स मालकांची झालेली अवस्था, वाद्यवृंदाचे कलाकार, रंगमंच कामगार यांना अनुदान मिळावं, सध्या तयार असलेल्या चित्रपटांबद्दल काय करता येईल असे अनेक मुद्दे यावेळी मांडले गेले.

यामध्ये राज ठाकरे यांनी काही मुद्दे मांडून आपण स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलंच, शिवाय पुढच्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल असा विश्वासही दर्शवला. गरज पडली, तर आपण मुख्यमंत्र्यांसोबतही झूम बैठक करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.