Snehal Tarde (Photo Credit - Insta)

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Vitthal Tarde) यांच्या बहुचर्चित, भव्यदिव्य ऐतिहासिक "सरसेनापती हंबीरराव" (Sersenapati Hambirrao) या महाराष्ट्राचा महासिनेमाच्या आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरने स्नेहल तरडे (Snehal Tarde) या छत्रपती ताराराणी यांच्या मातोश्री "सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते" यांची भूमिका साकारत आहेत हे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत त्यामुळे या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे हे रियल लाईफमध्ये एकमेकांची खंबीर साथ देणारे पती पत्नी आता रील लाईफमध्येही एकमेकांना साथ देताना पाहायला मिळणार आहेत.

स्नेहल तरडे यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास अत्यंत वेगळ्या पद्धतीने सुरू झाला. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धेसाठी सीलेक्ट झालेल्या एका मैत्रिणी बरोबर त्या सहजच प्रॅक्टिस बघायला गेल्या पण तिथे त्यांची ऑडिशन घेतली गेली आणि त्यांना अभिनयासाठी सीलेक्ट केलं गेलं. रंगमंचावर वावरताना त्यांना अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली. मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पटकावला. या स्पर्धेबरोबरच त्यांनी इतर विविध नाट्य स्पर्धा 30 पेक्षा जास्त पारितोषिके मिळवून गाजवल्या. पुढे अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये तसेच अभिमान आणि तुझं माझं जमेना या टीव्ही सिरीयल मध्ये काम केले.

लग्नानंतर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर शाळा, चिंटू, चिंटू २, देऊळ बंद, मुळशी पॅटर्न यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली तसेच काही काळ पोलीस खात्यात सेवा रूजू केली. बाहुबली आणि बाहुबली 2 या मराठीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे अनुरूप मराठी संवाद लेखन स्नेहल यांनी केले आहे. स्नेहल यांना भाषेची आवड असल्याने त्यांनी मराठी बरोबरच फ्रेंच आणि संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले आहे व सध्या त्या वेद अध्ययन करत आहेत. अशा या बहुआयामी आणि अष्टपैलू कलाकार स्नेहल तरडे यांनी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटात सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. (हे देखील वाचा: Akshay Waghmare: 'महाराष्ट्रात राहून मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावं लागतं...'अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत)

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट आज पासून ३० दिवसांनी म्हणजेच येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.