देऊळबंद, मुळशी पॅटर्न या सिनेमांनंतर लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'सरसेनापती हंबीरराव' (Sir Senapati Hambirrao) असे सिनेमाचा नाव असून या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. शिवजयंतीचं औचित्य साधत सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. "जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा... छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर... भव्यदिव्य शिवपरंपरा तुमच्यासाठी लवकरच.." असं म्हणत प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर सिनेमाचे जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे.
सिनेमाचे पोस्टर पाहता सरसेनापती हंबीररावांच्या भूमिका खुद्द प्रवीण तरडे साकारात असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या सिनेमात हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.
सिनेमाचे पोस्टर:
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांनी मान मिळवला होता. त्यांच्या कार्यावर आधारीत असलेला हा सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाऊंडेशन करत असून संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
यापूर्वी प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असून 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.