Gautami Patil Controversy News: गौतमी पाटील म्हटलं की कलेजा खलास होणारे असंख्य तरुण आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. एखादा राजकारणी अथवा एखादा सेलिब्रेटीही जमवू शकणार नाही इतकी गर्दी तिच्या कार्यक्रमाला होते. आता गर्दी म्हटले की, वाद विवाद, उताविळपणा आणि नाना प्रकारचे लोक आलेच. तिच्या कार्यक्रमातही तसे घडते. त्यातही ती नृत्यांगणा असल्याने तिचे नृत्य पाहून आणि तिला पाहण्यासाठी कासाविस झालेले लोक अनेकदा राडा करतात आणि मग पोलिसांचे काम वाढते. अलिकडील काळात तर तिचा कार्यक्रम आणि राडा हे समिकरणच झाले आहे. परिणामी पोलिसांकडून तिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात येत आहे. नुकतीच सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. त्यानंतर आता सोलापूर पोलिसांनीही गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे.
सोलापूर येथील स्थानिक 'डिजिटल वाहिनी'ने नवरात्रोत्सव काळात 'डिस्को दांडिया' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमास गौतमी पाटील ही प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ हे नवरात्रोत्सवकाळातील बंदोबस्तासाठी वापरण्यात येते. त्यामुळेल या कार्यक्रमासाठी (गौतमी पाटील) अधिकचा बंदोबस्त पुरविण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे शक्य नाही. त्यामुळेक पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. याबाबतचे एक पत्रच पोलिसांनी आयोजकांना दिल्याचे समजते.
कोठे होता गौतमीचा कार्यक्रम
एका स्थानिक न्यूज चॅनले आयोजित केलेला गौतमीचा कार्यक्रम वृंदावन गार्डन, एन आय जामगुंडी फार्म हाऊस, आसरा चौक, रेल्वे ब्रिज शेजारी, जुळे सोलापुर येथे 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत आयोजित करण्यात आला होता. 'डिस्को दांडिया' असे या कार्यक्रमाचे नाव होते.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिच्या अनेक कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमास परवानगी नाकारताना आयोजकांना दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा यापूर्वीचा इतिहास पाहता तो फारसा समाधानकारक नाही. या आधी त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाद-विवाद, भांडण आणि जमाव नियंत्रीत ठेवण्यासाठी पोलिसांना लाटीमारही करावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनाचा काळ लक्षात घेता तो नवरात्रोत्स काळात आहे. त्यामुळे पोलिसांकडे असलेले मनुष्यबळ विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी वापरले जाते. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास परवानगी नाकारली जात आहे.