Coronavirus: अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतर 45 जणांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार; कोरोना काळात दिला होता मदतीचा हात
प्रशांत दामले व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Photo Credit : twitter)

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) शिरकाव व त्यांनतर लागू केलेल्या लॉक डाऊनमुळे (Lockdown) अनेकांचे जीवन बदलले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले, लोकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. मनोरंजन क्षेत्रातही अनेकांना आपल्या कामांना मुकावे लागले. यादरम्यान इतर काही जण अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आले. कुणी पैशांची मदत केली, तर कुणी कपडे, अन्नधान्य पुरवले. आता कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे, अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात कोरोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कोरोना काळात समाजासाठी काम करण्याची अहिमहीका बघायला मिळाली, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्त्वाचे असते. कोरोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे यापुढेही कोरोना योद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरु ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली. यावेळी विविध इस्पितळांमधील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा 45 करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. (हेही वाचा: मध्य व पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता वाढवल्या लोकलच्या फेऱ्या, जाणून घ्या सविस्तर)

या व्यक्तींचा केला सत्कार –

भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप जाधव, परिचारिका दिपाली इंदुलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्य सेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरीट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वार्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वार्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी व देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडीओलॉजिस्ट डॉ.पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर हॉस्पिटलचे प्रकाश कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.