Choricha Mamla | Photo Credits: Priyadarshan Jadhav FB Post

अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) चा धम्माल सिनेमा 'चोरीचा मामला' (Choricha Mamla) मराठी रसिकांना खळखळून हसवल्यानंतर आता हिंदी सह 5 प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. हिंदी, तमिळ , तेलुगू, कन्नड , मल्याळम या पाच प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज होणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. दरम्यान नुकतीच प्रियदर्शनने ही माहिती फेसबूक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या पोस्टमध्ये मराठी रसिकांना अजून एक दिलेली गुडन्यूज म्हणजे लवकरच 'चोरीचा मामला 2' देखील भेटीला येणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रियदर्शन जाधवने 'चोरीचा मामला' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती. तर एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने हा सिनेमा बनवण्यात आला होता. हा सिनेमा 31 जानेवारी 2020 ला मराठीत रिलीज झाला आहे.

प्रियदर्शन जाधव ची फेसबूक पोस्ट

‘चोरीचा मामला’ या चित्रपटात पटकथा ही एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत आणि त्यामधून निर्माण होणारे प्रासंगिक विनोद याभोवती फिरत होती. आता दुसर्‍या भागात काय होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताने प्रियदर्शने आपण चोरीचा मामला 2 च्या पटकथेवर काम करत आहे. सोबतच नव्या शीषर्काचादेखील विचार केला जाणार आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सध्या कोरोना परिस्थितीशी जुळवून घेत मराठी कलाकारांनी सिनेमा, मालिकांचं शूटिंग सुरू केले आहे. काही सिनेमा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याच्या मार्गावर आहेत. अनेक मोठे सिनेमे सध्या सिनेमागृह पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.