जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारत देशात प्रवेश केला आणि हळूहळू आपली व्याप्ती वाढवायला सुरुवात केली. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 9152 वर पोहचला असून यापैकी सर्वाधिक रुग्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. तसंच दिवसागणित कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे संकट अधिकाधिक दाहक रुप धारण करत असताना आपल्या सुरक्षेसाठी अनेकजण झटत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सारे व्यवहार बंद असले तरी जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा देण्यासाठी अनेक बंधू-भगिनी कार्यरत आहेत. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, सुरक्षा रक्षक, पत्रकार, शेतकरी, भाजी-फळ विक्रेते, किराणा दुकानदार या कठीण काळात केवळ आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. पोलिस, डॉक्टर्स सह वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. या सर्वांना अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू यांसह अनेक मराठी कलाकारांनी मानाचा मुजरा केला आहे. यासाठी त्यांनी 'तू चाल पुढं' या गाण्याच्या खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तुम्हाला मराठी कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळणार आहे.
मराठी कलाकारांनी केलेला हा केवळ मानाचा मुजरा नसून त्यातून कोरोना व्हायरस संकटात काम करणाऱ्या सर्वांचे मनोबल वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. या व्हिडिओ मागची संकल्पना हेमंत ढोमे, समीर विद्वांस यांची असून गाणे जसराज जोशी, अजय गोगावले, प्रियंका बर्वे, दीपिका जोग यांनी गायले आहे. (Coronavirus विरुद्धच्या लढ्यात मराठी कलाकारांचा मदतीचा हात; सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह इतर कलाकारांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान)
पहा व्हिडिओः
यापूर्वी ही मराठी कलाकारांनी कोरोनाच्या संकटाची गंभीरता लक्षात घेत नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी देखील त्यांनी खास व्हिडिओ शेअर केला होता. तर अनेक कलाकारांनी संकटात आर्थिक मदतही केली आहे.