कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांचे खास आवाहन (Watch Video)
Marathi Celebrities appeal on Coronavirus (Photo Credits: Instagram)

संपूर्ण जगात धुमाकूळ घालणऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसचा दिवसागणित वाढत चाललेला प्रभाव पाहता सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तसंच लॉकडाऊनचा आदेश गांर्भायाने पाळत घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन सर्वच स्तराकडून करण्यात येत आहे. यासाठी आता मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav ), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) यांच्यासह अनेक कलाकारांनी एकत्रितपणे कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान 'जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. तसंच या व्हिडिओतून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही खास टिप्सही देण्यात आल्या आहेत. (बॉलिवूड कलाकारांकडून डॉक्टर, सफाई कामगार, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतूक; अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, यांच्यासह अनिल कपूर यांनी मानले आभार)

स्वच्छता पाळा, गर्दी टाळा, खोकताना, शिंकताना नाक-तोंडावर रुमाल धरा, हात धुवा, घरातील अन्न खा, यांसारख्या टिप्स यात देण्यात आल्या आहेत. तसंच घाबरुन न जाता जागरुक राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाळीव, वन्य प्राण्यांमुळे कोरोना पसरतो या गैरसमजूतीमुळे घरातील पाळीव प्राण्यांना बाहेर सोडण्यात येते तर ते टाळावे, असेही सांगण्यात आले आहेत.

पहा व्हिडिओ:

 

महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 89 रुग्ण असून देशात कोरोनाबाधितांची संख्या 400 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.