मराठी अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने हिला पुणे पोलीस (Pune Police) गुन्हे शाखेने कारवाई करत लातूर येथे बेड्या ठोकल्या. रोहिणी माने (Rohini Mane) हिच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप आहे. रोहणी माने ही आपली चित्रपटातील सहअभिनेत्री आहे. ती एका दहशतवाद विरोधी पथकामधील उपनिरीक्षकाच्या मदतीने आपल्यासोबत खंडणीखोरी करत असल्याचा आरोप अभिनेता सुभाष यादव (Actor Subhash Yadav) याने केला आहे. आलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलीस गुन्हे शाखा (Pune Crime Branch) कार्यकत झाली आणि तिने माने हिला बेड्या ठोकल्या.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने तसेच, राम भरत जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील इतर आरोपी पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे आणि सारा श्रावण अद्याप फरार आहेत. दरम्यान, रोहिणी माने हिने अभिनेता सुभाष यादव याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. या आरोपानंतर आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुभाष यादव यालाही अटक केली होती. (हेही वाचा, अभिनेत्री डॉली बिंद्रा हिच्याविरोधात गुन्हा दाखल)
दरम्यान, 'पुणे मिरर' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पुणे पोलीस क्राईम ब्रँच पथक कारवाईसाठी लातूरला गेले होते. दहशतवाद विरोधी पथक उपनिरीक्षक अमोल टेकाळे हे रोहिणी माने हिला खंडणी प्रकरणात मदत करत असल्याच्या माहितीवरुन हे पथक लातूरला गेले होते. मात्र, अटक होण्यापूर्वीच उपनिरीक्षक टेकाळे यांनी घटनास्थळावरुन पलायन केले. मग पथकाने आपला मोर्चा रोहिणीकडे वळवत तिला अटक केली. तसेच, सध्या उपनिरीक्षक अमोल टेकाळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.