भाग्यश्री (Photo credit: Instagram)

बॉलिवूडमध्ये असे फार कमी चित्रपट आहेत जे आपण अनेक वेळा पहिले तरी मन भरत नाही. असाच एक चित्रपट आहे, 1989 मधील 'मैंने प्यार किया' (Maine Pyaar Kiya). आज इतक्या वर्षानंतरही हा चित्रपट लोकांना चिरतरुण भासतो. या चित्रपटात सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) यांनी अभिनय केला होता. मात्र, 'मैंने प्यार किया' चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविणारी भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. तिची सलमानबरोबरची जोडी लोकांना चांगलीच आवडली होती, पण या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर जास्त दिसली नाही. मात्र आता भाग्यश्री पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार भाग्यश्री प्रभास (Prabhas) सोबत एका चित्रपटात दिसणार आहे. भाग्यश्रीने प्रभासच्या आगामी चित्रपटासाठी तिच्या वाट्याचे शूटिंगही सुरू केले आहे. पिंकव्हीलासोबत बोलताना भाग्यश्री आपल्या कमबॅकबद्दल म्हणाली, ‘हो मी एका चित्रपटावर काम करण्यास सुरवात केली आहे. मात्र, चित्रपटाच्या नावाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. लॉकडाउनच्या आधीच मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटामधील माझे हे पात्र खूप मजेदार आहे व  या पात्रासाठी मी बर्‍याच गोष्टी शिकल्या आहेत.'

भाग्यश्रीने सांगितले की ती सध्या दोन प्रकल्पांवर काम करीत आहे. तसेच तिची दोन्ही मुले अभिमन्यू आणि अवंतिका यांनी तिला अभिनयासाठी प्रोत्साहित केल्यामुळे तिने हा निर्णय घेतला. 'मैने प्यार किया' सुपरहिट झाल्यानंतर भाग्यश्रीने 1990 मध्ये हिमालय दासानीशी लग्न केले होते. त्यानंतर ती मुले आणि कुटुंबामध्येची व्यस्थ झाली. मात्र आतापर्यंत भाग्यश्रीने तेलुगु, कन्नड, मराठी, भोजपुरी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. (हेही वाचा: 93 वर्षांमध्ये पहिल्यांदाच Oscars 2021 पुढे ढकलला जाण्याची शक्यता)

दरम्यान, भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीतील पटवर्धन राजघराण्यात झाला आहे. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजा मानले जातात. भाग्यश्री तीन बहिणींमध्ये मोठी आहे.