93 वर्षांमध्ये पहिल्यांदाच Oscars 2021 पुढे ढकलला जाण्याची शक्यता; 93rd Academy Awards चे नवीन वेळापत्रक तयार करण्याबाबत चर्चा
OSCARS (Photo Credits: Getty)

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगामध्ये थैमान घातले आहे. जवळजवळ प्रत्येक देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. अशात अनेक स्पर्धा, कार्यक्रम, इव्हेंट्स एक तर रद्द झाले अथवा पुढे ढकलले. आता याचा फटका मानाच्या ‘ऑस्कर पुरस्कारा’ (Oscars 2021) लाही बसला आहे. 1929 मध्ये सुरू झालेला ऑस्कर पुरस्कार सोहळा 93 वर्षांमध्ये प्रथमच पुढे ढकलण्याक्बाबत चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे जगातील बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. नामांकनासाठीही पुरेसे चित्रपट नाहीत, म्हणूनच 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आता मे-जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

द सनच्या एका वृत्तानुसार, पुढच्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला अजून पुढे ढकलण्याबाबत आयोजक चर्चेत आहेत. ऑस्करसाठी एंट्रीज पाठविण्याची प्रक्रिया सहसा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये सुरू होते. नामांकन शॉर्ट लिस्ट नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान जाहीर होते व जानेवारीत ज्युरी सदस्य मतदान करतात. मात्र लॉक डाऊनमुळे No Time To Die, Top Gun: Maverick, Mulan आणि Marvel's Black Widow यांसारखे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. (हेही वाचा: हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ ठरणार अंतराळात शुटींग करणारा पहिला अभिनेता)

गेल्या महिन्यात अकादमीने वेळापत्रकात बदल केले. यावेळी सांगितले की, यावर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट 2022 पर्यंत नामांकन देऊ शकतात. जेणेकरुन या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी निर्माते हे चित्रपट प्रदर्शित करू शकतील. ऑस्कर अकादमीने साथीच्या पार्श्वभूमीवर काही नियम बदलले आहेत. मात्र हे नियम कायमस्वरूपी नसून, फक्त या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर लागू होतील. नामांकन वर्गवारीही कमी करून 23 करण्यात आली असल्याची माहिती, अकादमीने दिली आहे.