हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ ठरणार अंतराळात शुटींग करणारा पहिला अभिनेता; NASA प्रशासक जिम ब्रिडनस्टाईन यांनी दिली माहिती
Tom Cruise (Photo Credit: Twitter)

अंतराळ आणि अंतराळवीरांच्या बातम्या सर्वांनाच आकर्षित करतात. हा एक असा विषय आहे ज्यावर जगभरात अनेक चित्रपट बनले आहेत. आता याच विषयावर एक चित्रपट बनत आहे, मात्र त्याचे सादरीकरण असे असेल जे यापूर्वी कधीच कोणी पहिले नसेल. या चित्रपटाची धुरा सांभाळत आहे टॉम क्रूझ (Tom Cruise). हॉलीवूडचा अ‍ॅक्शन स्टार टॉम क्रूझ त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूट अवकाशात करण्याच्या तयारीत आहे. या अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपटाच्या शूटिंगसाठी हॉलिवूडचा हा स्टार नासा आणि एलन मस्कची (Elon Musk) अंतराळ कंपनी स्पेस एक्सशी (Space X) चर्चा करत आहे.

हा प्रयोग जगभरातील तमाम चित्रपटप्रेमींसाठी फार मोठी पर्वणी असेल.

अशाप्रकारे जर का सर्व गोष्टी जर का सकारात्मक घडल्या तर, हा चित्रपट अंतराळतात चित्रीकरण झालेला पहिला चित्रपट व टॉम क्रूझ हा असा पहिला अभिनेता ठरणार आहे. मात्र अजून तरी कोणत्याही गोष्टीची अधिकृत माहिती समोर आली नाही किंवा नासानेही यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नासा प्रशासक जिम ब्रिडनस्टाईन यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘नासा टॉम सोबत स्पेस स्टेशनवरील चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. आम्हाला नासाची ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अभियंते आणि वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रेरित करण्यासाठी, लोकप्रिय माध्यमांची आवश्यकता आहे.’

मस्कनेही याबाबत काही माहिती दिली नाही, मात्र ब्रिडनस्टाईनच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना, ‘खूपच मजा येईल’ असे लिहिले आहे. यावरून चित्रपटाची बोलणी बरीच पुढे गेली असल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी अनेक वेळा टॉमने अनेक विविधांगी प्रयोग केले आहेत. मिशन इम्पॉसिबल फिल्म सीरिजमध्ये टॉमचे असे अनेक अ‍ॅक्शन सीन् आहेत, ज्यांनी प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळविली. मग तो 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'मिशन इम्पॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल' चा बुर्ज खलिफावरील अ‍ॅक्शन सीन असो किंवा 'मिशन इम्पॉसिबल - रोग नेशन' मधील एअरप्लेन अ‍ॅक्शन सीन असो. (हेही वाचा: ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या मुलीला व्हायचंय Pornstar!)

विशेष म्हणजे टॉम लवकरच 'टॉप गन: मॅव्हरिक ' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1986 च्या ‘टॉप गन’ चित्रपटाचा सिक्वल आहे. चित्रपटाचा ट्रेलर बऱ्याच दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यावेळी हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार होता असे सांगितले होते, पण कोरोनाच्या प्रभावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यासह, 'टॉप गन: मॅव्हरिक' शिवाय मिशन इम्पॉसिबलच्या पुढील मालिकांवरही काम चालू आहे.