सेलिब्रेटी चॅट शो 'कॉफी विथ करण 6' (Koffee with Karan 6) मधील वक्तव्यामुळे ऑलराऊंटर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि लोकेश राहुल (KL Rahul) यांना BCCI ने दोन एकदिवसीय सामन्यातून निलंबित केले. महिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर दोघांवर चहुबाजूने टीका तर झालीच पण त्यांच्यावर क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही जोर धरु लागली. या प्रकरणार कॉफी विथ करण शोचा निर्माता आणि होस्ट करण जोहरने अखेर (Karan Johar) मौन सोडले आहे. एका न्युज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
करण जोहर म्हणाला की, "या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी माझी आहे. कारण हा माझा शो आहे, माझा मंच आहे. मी त्या दोघांना पाहुणे म्हणून शो मध्ये बोलावले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे जो काही वाद उसळला ती माझी जबाबदारी आहे. याची नुकसान भरपाई मी कशी करु, माझे बोलणे कोण ऐकेल? असा प्रश्न मला पडतो. हे प्रकरण आता माझ्या हाताबाहेर गेले आहे, असे मला वाटू लागले आहे." (IPL 12 सामन्यासाठी हार्दिक पांड्या- लोकेश राहुल यांना खेळण्याची परवानी द्या, आयपीएल संघाच्या मालकांची मागणी)
करण पुढे म्हणाला की, "मी जर काही बोललो असेल तर मी स्वत:ला पाठीशी घालणार नाही. जे प्रश्न मी महिलांना विचारतो तेच प्रश्न मी त्यांना विचारले. दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट आल्या होत्या तेव्हाही मी त्यांना असेच प्रश्न विचारले होते. पण या प्रश्नांची उत्तरे काय येतील, यावर माझे नियंत्रण नाही. हार्दिक आणि राहुलवर झालेल्या कारवाईबद्दल मला अत्यंत खेद आहे. मी टीआरपीसाठी असे प्रश्न विचारले, असे लोकांना वाटते. पण खरंतर मी टीआरपीची चिंता करत नाही."
पुढे करण म्हणाला की, "माझ्या शो च्या प्रॉडक्शन टीममध्ये 15-16 महिला आहेत. यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. असो, तरीही हा माझा शो आहे. या शो मध्ये जे काही झाले त्यामुळे दोघांच्या करिअरचे नुकसान झाले. यासाठी मी माफी मागतो. ते दोघे जे काही बोलले त्याची किंमत दोघांनीही चुकती केली आहे."