खंडेरायाचा महिमा परदेशातही; थायलंडमध्ये प्रसारित होणार 'जय मल्हार'
जय मल्हार (photo credit : MarathiStars.com)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची जीवनगाथा उलगडणारी मालिका, ‘जय मल्हार’ झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती. अतिशय कमी वेळात या मालिकेने लोकप्रियतेचे उच्चांक पार केले होते. पौराणिक कथेवर आधारित मालिकांमधील ही एकमेव मराठी मालिका म्हणता येईल जी इतकी लोकप्रिय ठरली. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना मराठी जनतेने उदंड प्रेम दिले. ही मालिका मराठी लोकांच्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक बनली होती की, लोकांनी या मालिकेत वापरले गेलेले दागिने आणि कपडे फॅशन म्हणून वापरायला सुरुवात केली. म्हणूनच ही मालिका तमिळ भाषेतही डब करण्यात आली. या गोष्टीची दखल आंतरराष्ट्रीय मिडीयाने देखील घेतली आणि आता ही मालिका थेट थायलंडमध्ये प्रसारित होणार आहे. तिकडच्या चॅनेलकडून नुकताच या मालिकेचा प्रोमोदेखील प्रसारित करण्यात आला आहे.

ही बातमी खुद्द देवदत्त नागे यांनी आपल्या फेसबुकवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही मालिका ‘zee nung’ या चॅनेलवर, 8 ऑक्टोबरपासून सोमवार ते गुरुवार रात्री 7.30 वा. प्रसारित होईल. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

18 मे 2014 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या मालिकेने यशस्वीरित्या 942 भागांचा टप्पा गाठत 15 एप्रिल 2017 ला रसिकांचा निरोप घेतला होता. त्यानंतरही या मालिकेचे लोकप्रियता तसूभरदेखील कमी झाली नव्हती. आजही देवदत्तकडे लोक खंडोबा म्हणूनच पाहतात. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून व्हीएफएक्स पद्धतीने या कथानकाला अधिक भव्यता मिळवून देणारी ही मराठीतील पहिली मालिका ठरली होती. महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती.