
कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग जस जसा देशात वाढायला लागला, तस तसे लॉक डाऊन (Lockdown) अजून कडक व्हायला सुरुवात झाली. यामुळे सध्या संपूर्ण देश जणू काही ठप्प झाला आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. बनविलेले चित्रपट रिलीज करणे शक्य झाले नाही आणि जे चित्रपट बनले होते त्यांचे शूट पुढे ढकलण्यात आले. त्याचप्रमाणे टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंगही थांबले आणि शोचे नवीन भाग टेलीकास्ट होणे बंद झाले. मात्र हळू हळू यात बदल होत आहे, भारत कोरोनाशी दोन हात करत आहे. अशात टीव्हीवरील काही महत्वाच्या शोजची पुन्हा वापसीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे.
टीव्ही शोच्या निर्मात्यांनी अशी व्यवस्था केली आहे की, जेणेकरून घरी बसलेले दर्शक त्यांचा आवडता कार्यक्रम पाहू शकतील. कौन बनेगा करोडपती, घर घर सिंगर, माधुरी डान्स शो आणि डान्स दिवाने सारखे बिग रिएलिटी शोज लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.
कौन बनेगा करोडपती -
अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’सह पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहेत. कौन बनेगा करोडपतीचा हा 12 वा सीझन असेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी कौन बनेगा करोडपती 12 शूट केले आहे. अलीकडेच सोनी टीव्हीने केबीसी 12 चा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बी लोकांना नोंदणीसाठी आमंत्रित करीत असल्याचे दिसत आहे.
रोडीज -
वेबसाइट्स आणि टीव्हीवर रोडीजच्या ऑनलाईन ऑडिशन्ससाठी जाहिराती येऊ लागल्या आहेत. निर्मात्यांनी यासाठी ऑनलाईन एन्ट्री मागण्यास सुरवात केली आहे. रोडीज हा खूपच चर्चित रिअॅलिटी टीव्ही शो असल्याने लॉक डाऊनच्या काळातही एमटीव्ही आपला नवीन सीझन थांबवू इच्छित नाही.
घर घर सिंगर -
नेहा कक्कड़ आणि तिचा भाऊ टोनी कक्कर, सोनू कक्कर एकत्र झी टीव्हीच्या नवीन ‘घर घर सिंगर’चा भाग होण्यासाठी तयार आहेत. या शोच्या माध्यमातून हे बहिण आणि भाऊ एकत्रित देशातील पहिला लॉकडाउन सिंगिंग सुपरस्टार शोधतील. नेहा, टोनी आणि सोनू कक्कर यांच्या या शोमध्ये स्पर्धक त्यांच्या घरातून ऑडिशन देताना दिसतील, यासह या बहिण-भावांची लाईफस्टाईलही प्रेक्षकांना दिसणार आहे.
डान्स दिवाने -
कलर्सचा लोकप्रिय कार्यक्रम डान्स दिवानेच्या ऑडिशन्सही ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. व्हूट वेबसाइटवर नर्तक आपले नृत्य व्हिडिओ अपलोड करू शकतात. व्हिडिओ 50 एमबीपेक्षा जास्त नसावा, ही अट आहे.