संजय लीला भन्साळीसोबत पहिल्यांदाच काम करणार ह्रितिक रोशन; हाजी मस्तानच्या भुमिकेत दिसण्याची शक्यता
Hrithik As Haji Mastan | (Facebook, Wikimedia & Commons)

ह्रितिक रोशनची (Hrithik Roshan) गाडी सध्या भलतीच वेगात पळते आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी आलेला 'वॉर' (War) 300 कोटींची मजल मारत सुपरहिट झालाय, तर दुसरीकडे सिनेमांच्या ऑफर्स थांबायचं नाव घेत नाहीयेत. फराह खान सोबत 'सत्ते पे सत्ता' वर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो 'क्रिश 4' च्या तयारीला सुद्धा सुरवात करेल. त्याच वेळी त्याच्या कडे निखिल अडवाणीची एका स्पायच्या आयुष्यावर आधारित स्क्रिप्टही आहे. पण आता ह्रितिक कडे एक अशी भूमिका आली आहे, जी त्याच्या करियर मध्ये एक वेगळ्या धाटणीची ठरू शकते. संजय लीला भन्साळींनी (Sanjay Leela Bhansali) त्याला हाजी मस्तान साकारण्यासाठी विचारणा केली आहे.

आलिया आणि सलमानचा 'इन्शाल्लाह' बंद झाल्यानंतर भन्साळी यांनी लगेचच 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) ची घोषणा केली होती. या सिनेमासाठी आलियाची निवड आधीच झाली होती. शोध सुरु होता तो अभिनेत्याचा. कार्तिक आर्यन आणि अजय देवगण पैकी कोणा एकाची तरी निवड होईल, असे बोलले जात होते. पण आता ही भूमिका ह्रितिककडे गेली आहे. (हेही वाचा. War मध्ये रॉ एजन्ट साकारल्यानंतर आता Hrithik Roshan करणार एका स्पायची भूमिका?)

'गंगुबाई काठियावाडी' ची कथा हुसेन झैदीच्या 'माफिया कामाठीपुरा' या पुस्तकावर आधारित आहे. यात आलिया गंगुबाई या 70 आणि 80 च्या दशकात कार्यरत असलेल्या कोठ्याच्या मालकिणीची भूमिका साकारत आहे. तर ह्रितिकला हाजी मस्तानच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे. त्याने होकार दिल्यास ह्रितिक, आलिया आणि भन्साळी तिघांचाही एकमेकांसोबतचा हा पहिला चित्रपट असेल.