Salman Khan 53rd Birthday : सलमानकडून चाहत्यांना गिफ्ट; विकायला काढले आपले लकी ब्रेसलेट
संग्रहित - संपादित प्रतिमा

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त काल रात्री पनवेलच्या फार्म हाउसवर एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आज 53 व्या वर्षीही सलमान खानचा चार्म तसूभरही कमी झाला नाही. यातच त्याच्या यशाचे गमक दिसून येते. ऐश्वर्या राय प्रकरणानंतर ‘तेरे नाम’ चित्रपटाद्वारे सलमान खानने पुन्हा नव्या दमाने एंट्री घेतली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही. याचे श्रेय जाते त्याचे नशीब, मेहनत आणि त्याच्या हातातील ब्रेसलेटला. होय सलमान नेहमीच म्हणत आला आहे की त्याच्यासाठी त्याचे ब्रेसलेट फार लकी आहे. आकाशी रंगाचा फिरोजा दगड असलेले हे सिल्व्हर कलरचे ब्रेसलेट नेहमीच आपण सलमानच्या हातात पाहत आलो आहोत. आता हे ब्रेसलेट तुमचे होण्याचे संधी सलमानने चाहत्यांना उपलब्ध करून दिली आहे.

आपल्या वाढदिवसाच्या आधी एक दिवस सलमानने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. आपले हे लकी ब्रेसलेट त्याने विकायला काढले आहे. सलमान खान बीइंग ह्यूमन (Being Human) ज्वेलरी सीरीज अंतर्गंत विकणार आहे. हे ब्रेसलेट सलमानला त्याच्या वडिलांनी दिले होते. आता हे ब्रेसलेट फ्लिपकार्टवर आणि निवडक बीइंग ह्युमन क्लोथिंग स्टोअर्समध्ये ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. याबाबत एक व्हिडिओ सलमानने पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये सलमानखान सोबत त्याचे वडील सलीम खानदेखील दिसत आहेत. त्यांनी देखील आपल्या हातात सलमान खानप्रमाणे ब्रेसलेट घातले आहे. तर आता फ्लिपकार्टवर अवघ्या 699 रुपयांमध्ये तुम्ही हे ब्रेसलेट खरेदी करू शकता. (हेही वाचा : पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान खानच्या बर्थडेची धूम; बॉलिवूड स्टार्सची हजेरी)

दरम्यान सलमान खान हा प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. त्याने ;बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटामार्फत बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवले. हम आपके है कौन, हम साथ साथ है, साजन, वाँटेड, दबंग, एक था टायगर, बजरंगी भाईजान, तेरे नाम, रेस हे त्याचे काही हिट झालेले चित्रपट होय.