चित्रपट, मालिका, ओटीटी उद्योगातील 65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
Shooting | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्य ती पूर्ण काळजी घेऊन 65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी संबंधित 65 वर्षांवरील कलाकार आणि क्रू सदस्य कामाला पुन्हा रुजू होऊ शकतात. मात्र त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक असणार आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली आहे.

कोविड-19 लॉकडाऊनमुळे तब्बल 4 महिने बंद असलेले मालिका-सिनेमांचे शूटिंग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्यात आले. मात्र 65 वर्षांवरील कलाकार, क्रु सदस्य आणि लहान मुलं यांनी शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु, आता त्यांच्यासाठीही शूटिंगची दारं खुली झाली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कलाकारांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. (मालिका-चित्रपटाच्या नियमात काही बदल करुन शूटिंगला सुरुवात; 60 वर्षांवरील कलाकार आणि लहान मुलांना सेटवर बंदी कायम)

MAHARASHTRA DGIPR Tweet:

कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. परंतु, अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला राज्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या सेवा-सुविधा पुन्हा सुरु करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मंगळवारी आलेल्या अपडेटनुसार, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 6,15,477 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,37,870 रुग्ण बरे झाले असून 1,56,608 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 20,687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.