प्रभाकर पणशीकर, विजया पणशीकर कुटुंब (Photo Credits: Instagram)

नाट्यसंपदा नाट्यसंस्थेच्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर (Vijaya Prabhakar Panshikar) यांचं निधन झालं आहे. गुरुवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 1.30 वाजता त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्याचबरोबर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे.

प्रभाकर पणशीकर यांनी 1963 साली नाट्यसंपदा या संस्थेची स्थापन केली. नाट्यसंपदेने रंगमंचावर आणलेली 'अमृत झाले जहराचे' आणि 'मोहिनी' अशी दोन नाटके फारशी चालली नाहीत. मात्र त्यानंतर 'मला काही सांगायचंय', 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकांनी नाट्यसंपदेला आर्थिक यश, स्थैर्य आणि प्रसिद्धी मिळवून दिली.  'कट्यार काळजात घुसली' या संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. यासोबतच 'अश्रुंची झाली फुले', 'संत तुकाराम' या नाटकांनी विक्रम रचला.

(हे ही वाचा: झपाटलेला सिनेमात 'बाबा चमत्कार' ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन)

विजयाताईंचे माहेरचे आडनाव कुलकर्णी असे होते. लग्नानंतर त्या विजया प्रभाकर पणशीकर झाल्या. नटवर्य पणशीकर यांचे 2011 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे रंगकर्मीवरील कार्य अफाट होते. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकर यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कारही दिला जातो.