
दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभुमीवरचा असेल तर तो अधिक रंगतदार आणि संस्मरणीय ठरतो. या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी त्या विषयाच्या आशयाला आणि सादरीकरणाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. अगदी हाच आणि असाच एक सुखद अनुभव रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स ही निर्मिती संस्था - 'पियानो फॉर सेल' या नाटकाद्वारे! आणि या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभुमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत - वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे-विज.
आशिष कुलकर्णी यांनी लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित 'पियानो फॉर सेल' या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन केले आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.
1982 सालच्या ब्रह्मचारी नाटकामधील वर्षा उसगांवकर यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. या नाटकापासून त्यांना प्रसिद्धी मिळून पुढे त्या चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या नायिका बनल्या. तर मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी, आधे अधुरे ही किशोरी शहाणे यांची गाजलेली नाटके होय.