फ्लाईंग राणी: सामाजिक अहंकार आणि नैतिकतेच्या बुरख्याला धक्का
फ्लाईंग राणी मराठी नाटक

Flying Rani Marathi Natak Review: 'फ्लाईंग राणी' या दोन अंकी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये रंगला. प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या एका कथेवरुन प्रेरीत असलेले हे नाटक, रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक एकांकीका स्पर्धा गाजवताना मिळालेल्या तूफान यशामुळे दिग्दर्शकाने या एकांकीकेचे बहुदा दोन अंकी नाटकात रुपांतर केले असावे. नाटक पाहताना त्यावर एकांकीकेचा प्रभाव जाणवत असला तरी आशय आणि मांडणी यामध्ये दिग्दर्शकाने कोणतीही तडजोड केलेली दिसत नाही. परिणामी प्रयोग रंगत जाताना प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. नैतिकतेचा टेंभा मिरणाऱ्या आणि खास करुन पुरुषी अहंकारात वावरणाऱ्या तथाकथीत सामाजास नाटक धक्का देताना दिसते.

'बायकोमधल्या बाईतील आई' आणि परिस्थितीने तिच्यासमोर उभे केलेले प्रश्न घेऊन नाटक पुढे सरकत राहते. खरेतर ते प्रश्न आणि त्या प्रश्नाला भीडलेली बाई, त्यातून नव्याने निर्माण होणारे प्रश्न आणि गुंता हेच या नाटकाचे कथानक आहे. कुटल्याशा एका गावखेड्यातून मुंबईसारख्या म्हटलं तर मायानगरी म्हटलं तर बकाल शहराच्या आश्रयाला आलेलेल हे कुटुंब. नवरा-बायको, कॉलेजमध्ये शिकणारी पोरगी आणि म्हातारी आई, असे हे चौकोणी कुटुंब. अंगामध्ये पुरुषी अहंकार ठासून भरलेला नवरा, त्या नवऱ्याच्या वळचणीला राहणे हेच आयुष्य माणून संसार रेटणारी बायको. दम्याने घायकुतीला आलेली पण आयुष्यातील अनेक चढउतार पाहिलेली म्हातारी, तारुण्यासोबत खुणावणारी क्षीतीजे आणि डोळ्यात स्वप्ने घेऊन कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी या चार पात्रांभोवती नाटक फिरत राहते. नाटक या चार पात्रांमध्ये फिरत असले तरी, नाटकाच्या मध्यावर होणारी कमलीची एण्ट्री कथानकाला वळण देते. तिथूनच सुरु होतो सामाजिक अहंकार आणि नैतिकतेच्या बुरख्याला धक्का धक्का देणाऱ्या 'फ्लाईंग राणी'चा प्रवास.

फ्लाईंग राणी मराठी नाटक

वेश्या असण्याचा रुबाब मिरवणारी, त्या रुबाबावार समाजाला उभं-आडवं फाट्यावर मारणारी, पण भावनांच्या कल्लोळात व्याकूळ होणारी कमला नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. घरामध्ये कमावता पुरुष असलेला नवरा अपघात होऊन कायमचा अपंग होतो. घर आर्थिकदृष्ट्या लुळपांगळं पडतं. ते सावरायचं तर उंबरठा ओलांडायला हवा. ते ओळखून घराबाहेर पडलेली बायको (आशा) आणि कमला (वेश्या) यांची अपघातानं भेट होते. या भेटीमुळे आशाला एका अनोख्या जगाची ओळख होते. जिथे पैसा आहे पण प्रतिष्ठा नाही. पोटासाठी, पैशासाठी नात्यासाठी होणारी आशाची कुतरओढ प्रेक्षकांना अस्वस्थ करुन जाते. चार भींतीच्या आत भलेही वेश्या एकेक कपडा उतरवत असेल. पण, तिच्या प्रत्येक शब्दागणीक समाज नागडा होताना दिसतो. दुसऱ्या बाजूला कमलाच्या वाक्यागणीक या नागड्या समाजाची लख्तरे निघताना पाहायला मिळतात.

फ्लाईंग राणी मराठी नाटक

नाटकातील भूमिका आणि कलाकार

आशा - निकिता घाग, किशोर - दीपक जोईल, म्हातारी - उन्नती तांबे, राणी - रुचिका तांबे, कमली - पूजा कांबळे, पुरुष - प्रणव सोहनी, मुकादम - प्रतीक बारने, मंदा - वैष्णवी पोतदार, सुधा (मित्र) - श्रमिक जाधव

फ्लाईंग राणी मराठी नाटक

लेखक - मोहन बनसोडे, दिग्दर्शक - विजय पाटील, संगीत - शुभम राणे, प्रकाशयोजना - सिद्धेश नांदलस्कर, नेपथ्य व वेषभूषा - विशाल भालेकर

फ्लाईंग राणी मराठी नाटक

जगासोबत लढण्याचं बळ कितीही अंगी बाळगलं तरी एका टोकावर नात्यात जेव्हा नैतिकता, दांभीकता, बडेजाव आणि अहंकाराची कवचकुंडले गळून पडतात तेव्हा सत्याला भिडावच लागतं. सत्य नेहमीच नग्न असतं. तिथं कोणताही आडपडदा येत नाही. त्यामुळे वेश्या व्यवसाय सामाजिक अर्थाने अनैतिक असला तरी मानवता या अर्थाने आपल्याला समाज म्हणून तो स्वीकारावच लागतो. हा व्यवसाय आणि माणूसपणाचं जगणं याकडे डोळसपणे बघण्याची नजर हे नाटक देऊ पाहते. लेखकाने लिहिलेल्या वाक्याबरहूकम ही नजर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे दिग्दर्शकाने मिळवलेले यश आहे.

फ्लाईंग राणी मराठी नाटक

प्रायोगिक असले तरी व्यवासायिक यश मिळवण्याची धमक

नाटकातील जवळपास सर्वच कलाकारांनी अतीशय चांगले काम केले आहे. कलाकार आपापल्या भूमिका चोख बजावताना दिसतात. पण नाटक पाहताना पात्रांची बहुगर्दी टाळता आली तर पाहायला हवे. नैपथ्य आणि प्रकाशयोजनेचा प्रभावी वापर करुन हे नाटक आणखी उठावदार करता येऊ शकते. ट्रेनमधील प्रवास, वेश्यागल्ली, यांच्याबाबत दिग्दर्शकाने केलेला प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. फक्त कथानकाच्या गरजेमुळे वारंवार बदलला जाणारा सेट थोडासा रसभंग करताना आढळतो. प्रायोगिक असले तरी, काही किरकोळ बदल केल्यास आणि कथानकाचा वेग थोडा संयत केल्यास नाटक व्यावसायिक यश मिळविण्याची धमक ठेवते आहे.