
Children's Day 2019 Special: दरवर्षी प्रमाणे 14 नोव्हेंबर रोजी म्हणजेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या जयंती निमित्त देशात बाल दिन (Bal Din) साजरा केला जाणार आहे. वर्तमानात बालपण जगणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात दडलेल्या लहान मुलाचे लाड पुरवण्याचा हा दिवस आहे. असं म्हणतात लहान मुलं ही आपल्या निरागसतेने सर्वांच्याच आयुष्यात आनंद पसरवतात (काही वेळा त्रास देण्याचा प्रसंग बाजूला ठेवुयात) त्यामुळे या खास दिवशी त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याची ही उत्तम संधी आहे. पण मग खास करायचं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. साहजिकच लहान मुलांना गिफ्ट द्यायचं म्हंटल की, चॉकलेट, खेळणं अशा नेहमीच्या पर्यायांच्या पुढे काही सुचतच नाही.. हो ना? यावेळेस मात्र काही काळासाठी पुरणारा खाऊ देण्यापेक्षा तुमच्या लहान मुलांना विचारांचा खाऊ देता आला तर? विचारांचा खाऊ म्हणजेच यंदा एखादं नाटक दाखवून तुम्ही आपल्या लहानग्यांना एक वेगळं गिफ्ट देऊ शकता. सद्य घडीला मराठी रंगभूमीवर सुरु असणारी बालनाट्य त्यासाठी उत्तम पर्याय ठरतील.
चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ही 5 खास बालनाट्य..
अलबत्त्या गलबत्त्या
अभिनेता वैभव मांगले याने साकारलेली चिंचि चेटकीण मागील वर्षभरापासून मराठी रंगभूमीवर गाजत आहे. विनोदी शैलीच्या या नाटकाचे शोज सध्याही मोठ्या प्रतिसादात सुरु आहे.
कापूस कोंड्याची गोष्ट
लहानपणी सांगितल्या जाणाऱ्या दंतकथांमधील एक म्हणजेच कापूस कोंड्याची गोष्ट अभिनेता अतुल परचुरे आणि त्याची चिमुकली पार्टनर मैथिली पटवर्धन रंगभूमीवर घेऊन आले आहेत. नुकतेच या नाटकाचे प्रयोग सुरु झाले आहेत.
निम्मा शिम्मा राक्षस
गायत्री दातार, मयुरेश पेम यांच्या मुख्य भूमिकेत निम्मा शिम्मा राक्षस हे नाटक सध्या जोरदार सुरु आहे. शहजादी आणि राक्षसाची कथा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत आहे.
भीमचा वाढदिवस वाघोबाचं नाटक
लहान मुलांना आवडतील अशी पात्र म्हणजेच छोटा भीम, वाघोबा यांची मस्ती पाहायची असेल तर 'भीमचा वाढदिवस वाघोबाचं नाटक' हे नक्कीच पाहण्यासारखं आहे. यामध्ये लहान मुलेच परफॉर्म करत असल्याने याची गमंत आणखीनच वाढते.
जंगलबुक द ट्रेजर
नॅशनल रेकॉर्ड पुरस्कृत पहिले बालनाट्य जंगलबुक हे सध्या अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल होत आहे. भव्य दिव्य सेट सहित गोरिला, डायनासॉर या प्राण्यांच्या रूपातील धम्माल पाहण्यासाठी हे नाटक बेस्ट पर्याय आहे.

ही बालनाट्य मोठयांना सुद्धा आवडतील अशी आहेत, त्यामुळे तुमच्या घरातील लहानग्यांसोबत तुमच्यासाठीही ही एक छान पर्वणी ठरू शकते. त्यामुळे यंदाच्या बालदिनाला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं असं गिफ्ट तुमच्या चिमुकल्याला देत हा अनुभव कसा होता हे आमच्यासोबत नक्की शेअर करा.