बालाकोट एअर स्ट्राईक आता रुपेरी पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका
Vivek Oberoi And Abhinandan Varthman (Photo Credits: Facebook, IANS)

उरी- द सर्जिकल स्ट्राईक (URI- The Surgical Strike) च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय सैन्याचा आणखीन एक पराक्रम रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. पुलवामा (Pulwama) हल्ल्यानंतर झालेला बालाकोट एअर स्ट्राईक (Balakot Air Strike) आणि विंग कमांडर अभिनंदन (Abhinandan)  यांच्यावर एक नवा कोरा सिनेमा बॉलिवूड मध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बायोपिक मध्ये मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi)  हा या सिनेमातही प्रमुख पात्र साकारणार आहे. (सेक्रेड गेम्स 2 वादाच्या भोवऱ्यात; अनुराग कश्यप विरुद्ध FIR दाखल, एका शॉटमुळे UAE येथील व्यक्तीला जगभरातून फोन)

पुलवामा हल्ल्याच्या बदला घेत भारतीय हवाई दलाने पार पाडलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकला सलाम करण्यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याचे विवेकने सांगितले आहे. या सिनेमाचे शूटिंग जम्मू, काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या भागात होणार असून यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवल्यावर या वर्षाच्या शेवटी चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळणाऱ्या प्रतिसादानंतर याचे तामिळ, तेलगू आणि भाषेतही रिमेक करण्याचे प्लॅन्स विवेकने बोलून दाखवले आहेत, यासाठी त्या इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकारांना घेऊन सिनेमा बनवण्यात येईल.

दरम्यान, फेब्रुवारी मध्ये भारतीय जवानांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून पुलवामा येथे हल्ला होऊन ४० जण शहीद झाले होते. या हल्ल्याला उत्तर देत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशवादी तळावर हल्ला केला होता. या घटनेमध्ये भारतचे देखील एक लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. या विमानात असणारे विंग कमांडर अभिनंदन, त्यांना पाकिस्तानी नागरिक व सैन्याने दिलेला त्रास, आणि त्यांच्या संघर्षाची कथा मांडणारा असा हा चित्रपट असणार आहे.