सेक्रेड गेम्स (Sacred Games), भारतातील सर्वात बहुचर्चित वेबसीरीज. या सीरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटांचा कंटेंट बदलेल अशा अशा पल्लवित झाल्या. त्यानंतर सर्वांनाच याच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. मात्र दुसऱ्या सीझनने चाहत्यांची घोर निराशा केली. आठ तासांमध्ये संपूर्ण कथेची मांडणी व्हावी म्हणून अनेक गोष्टींना फाटा देण्यात आला. ज्यामुळे कथेमधील अनेक लिंक प्रेक्षकांच्या ध्यानात येत नाहीत किंवा त्या मधेच सुटल्या आहेत. असो आता ही वेबसीरीज अजून दोन गोष्टींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सेक्रेड गेम्स सीझन 2 मधील एका सीनमुळे शीख धर्मियांच्या (Sikh Community) भावना दुखावल्या असल्याचे दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंह बग्गा (Tajinder Pal Bagga) यांचे म्हणणे आहे. याबाबत अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सध्या या एफआयआरची प्रत सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. शीख धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी हा सीन मुद्दाम या सीरीजमध्ये समाविष्ट केला असल्याचे बग्गा यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा, Sacred Games 2 नेटफ्लिक्स वर 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता होणार टेलिकास्ट; पहा नेटकर्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया)
Filed Police complaint against Anurag Kashyap for insulting my religious belief in Sacred Games-2 @advocate_alakh pic.twitter.com/sGmAw12sOy
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) August 20, 2019
या सीरीजमधील एक सीनमध्ये सरताज सिंह (सैफ अली खान) ला समजते की, त्याचे वडील गुरुजींच्या मिशनचा (हे जग नष्ट करणे) एक महत्वाचा हिस्सा होते. तेव्हा चिडलेला सरताज आपल्या हातातील कडा समुद्रात फेकून देतो. या सीनवर तेजेंद्र पाल सिंह बग्गा यांनी आक्षेप घेतला आहे. शीख धर्मीयांमध्ये कडा अतिशय पवित्र मानला जातो. शीख धर्मीय ज्या पाच गोष्टी आपल्यासोबत बाळगतात त्यामधील एक गोष्ट कडा असते. असे असताना कडा फेकून देण्याचा सीन का घालण्यात आला ? असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसऱ्या एका प्रकरणामध्ये थेट युएईमधील (UAE) एका व्यक्तीने या सीरीजच्या एका शॉटवर आक्षेप घेतला आहे. या सीरीजमधील एका शॉटमध्ये चक्क युएईस्थित व्यक्ती कुन्हाबदुल्ला सीएम यांचा फोन नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. भारतीय गुप्तहेर एजंट, कुसुम देवी यादव (अमृता सुभाष) केन्या येथे गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) याला एका चिट्ठीमध्ये ईसाचा नंबर देते. वास्तवात हा नंबर खरा असून तो कुन्हाबदुल्ला सीएम यांचा आहे.
ही सीरीज प्रदर्शित झाल्यावर त्यांना दुबई, भारत, पाकिस्तान, नेपाळ अशा ठिकाणांहून फोन येण्यास सुरुवात झाली. तीन दिवसांमध्ये त्यांना अगणित फोन आले. याबाबत तक्रार केल्यावर शेवटी हा फोननंबरचे सबटायटल काढून टाकण्यात आले.