Vicky Kaushal-Katrina Kaif’s Wedding: विकी कौशल व कतरिना कैफने लग्नाच्या टेलिकास्टचे अधिकार Amazon Prime ला विकले; 80 कोटींना झाली डील- Reports
Vicky Kaushal & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

अखेर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. 7 रोजी संगीत समारंभ, 8 डिसेंबर रोजी हळदी समारंभ आणि त्यानंतर रात्री पार्टी ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, 9 डिसेंबर रोजी हे जोडपे सात फेरे घेतील. कतरिना-विकीचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु इतके दिवस त्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून त्यांना कतरिना-विक्कीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत.

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला विकले आहेत. या जोडप्याने हे हक्क 80 कोटी रुपयांना विकले आहेत. हेच कारण आहे की, या लग्नाबाबत इतकी प्रायव्हसी ठेवण्यात आली आहे. इतक्या मोठ्या डीलमुळे कतरिना-विक्कीने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांकडून नॉन-डिक्लोजर अॅग्रीमेंट (NDA) वर स्वाक्षरी घेतली आहे. याद्वारे त्यांच्या लग्नाशी संबंधित कोणताही फोटो अॅमेझॉन प्राइमच्या आधी लीक होऊ नये.

अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित केल्या जाणार्‍या व्हिडिओमध्ये कतरिना आणि विकी कौशल यांच्या रोका समारंभापासून ते लग्नापर्यंतचे फुटेज समाविष्ट असेल. 2022 च्या सुरुवातीला हा व्हिडिओ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

या शाही लग्नाला आणखी खास बनवण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर पाहुण्यांसाठी एक भव्य पूल पार्टी (प्री वेडिंग पार्टी) देखील आयोजित करण्यात आली आहे. वधू-वरांच्या लग्नासाठी 5 फुटांचा केक तयार करण्यात येणार असल्याच्याही बातम्या आहेत. हा केक बनवण्याची जबाबदारी इटलीच्या खास शेफला देण्यात आली आहे. कतरिना-विक्कीच्या लग्नात 120 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून या पाहुण्यांना लग्नात खास जेवण वाढण्यासाठी मुंबईतून 300 क्रॉकरी सेटही मागवण्यात आल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा: T-Series ने रचला इतिहास; बनले 20 कोटी पेक्षा जास्त सब्‍सक्रायबर्स मिळवणारे जगातील पहिले YouTube चॅनेल)

रिपोर्टनुसार, लग्नात सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोणत्याही अतिथीला गुप्त कोडशिवाय प्रवेश दिला जात नाही. मंगळवारीही काही वाहनांचा ताफा लग्नस्थळी पोहोचला होता. सुरक्षा कोडशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मंगळवारी नेहा धुपिया, अंगद बेदी, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, अभिनेत्री शर्वरी बाग वेडिंग वेन्यूवर पोहोचले. आजही अनेक मोठे सेलिब्रिटी लग्नाला हजेरी लावू शकतात. यामध्ये शाहरुख खान, करण जोहर, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि अक्षय कुमार यांच्या नावांचा समावेश आहे.