आजकाल, इंटरनेट बँकिंगचा ट्रेंड जितका सामान्य होत चालला आहे, तितकेच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. लोकांना व्हॉट्सअॅप, मोबाईल मेसेज, इमेल्सद्वारे दररोज अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातात. अशा मोहक ऑफर्सना भुलून लोक त्या मेसेजेसवर किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करतात आणि क्षणार्धात त्यांच्या खात्यातून पैसे गायब होतात. अशा चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन बँका आणि इतर संस्था करत असतात. आता असेच आवाहन अभिनेता राजकुमार (Rajkummar Rao) रावही करत आहे. सायबर चोरांनी अभिनेत्याने नावावर कोट्यावधी रुपये लुटण्याची योजना बनवली होती.
चोरांनी राजकुमार राव याच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून जवळजवळ 3 कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता. अभिनेत्याने बनावट ईमेलची एक प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये दिसत आहे की, अभिनेत्याच्या नावावर चित्रपट करारासाठी 3 कोटी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आपल्या नावाने अशी फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. आपल्या पोस्टद्वारे त्याने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला.
राजकुमार रावने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या नावाने बनवलेल्या बनावट ईमेल आयडीची माहिती दिली आहे. अभिनेत्याने लिहिले, '#FAKE कृपया अशा बनावट लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडी आणि व्यवस्थापक वापरून लोकांना माझ्या नावाने फसवत आहेत.’ राजकुमारने शेअर केलेल्या बनावट ईमेलच्या कॉपीमध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपट करारासाठी 3.1 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
‘हनीमून पॅकेज' नावाचा हा चित्रपट असून, जो श्री संतोष मस्की लिहित आहेत व तेच दिग्दर्शित करणार आहेत. ‘आपण सध्या मुंबईमध्ये नाही. त्यामुळे माझ्या बँक खात्यात 3 कोटी 10 लाख (एकूण शुल्काच्या 50%) जमा करावे. किंवा 10 लाख रोख आणि 3 कोटी चेकद्वारे द्यावे.’ असे या खोट्या मेलमध्ये लिहिले आहे. (हेही वाचा: Vicky Kaushal: इंदौरमध्ये 'विकी कौशल' विरोधात तक्रार दाखल, जाणुन घ्या काय आहे प्रकरण?)
फक्त राजकुमार रावच नाही तर, याआधी मेगास्टार अमिताभ बच्चन, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, श्रुती हसन, अमिषा पटेल, फराह खान, उर्मिला मातोंडक यांचेही सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते.