अमिताभ बच्चन (Image Credit: Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात लोकांनी अनेक समस्यांचा सामना केला. इतके महिने लोक धीराने या विषाणूला तोंड देत आहेत. मात्र या काळात एका कॉलर ट्यूनमुळे (Caller Tune) काही जणांना संयम सुटला. कोरोना कालावधीत, लोकांना सर्व प्रकारे जागरूक केले गेले. त्याअंतर्गत फोनच्या कॉलर ट्यूननेही कोरोनाचा उल्लेख करण्यास सुरवात केली. या कॉलर ट्यूनद्वारे बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजात एक जागरूकता संदेश सुरू करण्यात आला होता. परंतु आता शुक्रवारी (15 जानेवारी) पासून बिग बीच्या आवाज कोरोना कॉलर ट्यूनमध्ये ऐकू येणार नाही.

या कॉलर ट्यूनमधून बिग बीचा आवाज काढून टाकण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती, परंतु यामुळे कॉलर ट्यून बदलली जाणार नाही. तर आता कोरोना लसीकरणाची नवीन कॉलर ट्यून सुरु करायची असल्याने ही जुनी कॉलर ट्यून काढून टाकली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, 15 जानेवारीपासून कोरोना कॉलर ट्यून बदलली जात आहे, ही नवीन ट्यून लसीकरणावर आधारित असेल.

सध्या कॉल करण्यापूर्वी कोरोना व्हायरस कॉलर ट्यून ऐकू येत आहे. अनेकांनी ही ट्यून त्रासदायक वाटत असल्याचे सांगितले होते. ही कॉलर ट्यून हटवली जावी म्हणून अनेक प्रयत्न झाले मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता या कॉलर ट्यूनसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. (हेही वाचा: Amitabh Bacchan COVID19 Caller Tune: कोरोना व्हायरसवरील अभिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवावी, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल)

या याचिकेत म्हटले आहे की, अमिताभ बच्चन यांचा आवाज कोरोना कॉलर ट्यूनमधून काढून टाकला पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. ते स्वतः जर का स्वतःचे संरक्षण करू शकत नसतील तर ते दुसऱ्याला काय उपदेश देतील.

मात्र आता सुंठीवाचून खोकला गेला आहे. लसीकरणामुळे शासनाने स्वतः अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.