सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांची खासदार संजय राऊत यांना नोटीस, माफी मागण्यासाठी 48 तासांची मुदत; जाणून घ्या काय म्हणाले Sanjay Raut
संजय राऊत व सुशांत सिंह राजपूत (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) संबंधीच्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुशांतसिंह राजपूत आणि त्याचे वडील यांच्यातील संबंधांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. या विधानासंदर्भात सुशांतचा चुलतभाऊ आणि भाजपचे आमदार नीरजकुमार बबलू यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईमेलद्वारे कोर्टाची नोटीस पाठवली आहे. तसेच सुशांतच्या कौटुंबिक गोष्टींबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागण्यासाठी राऊत यांना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे.

संजय राऊत असे करण्यात अपयशी ठरल्यास, सक्षम न्यायालयात संबंधित कलमांखाली खटला दाखल केल्यास, यासाठी तेच जबाबदार असतील असे नीरज बबलू यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आमदार नीरजकुमार बबलू यांचे वकील अनीश झा म्हणाले की, ‘शिवसेना पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये छापलेल्या लेखात त्यांनी अशा काही दिशाभूल करणार्‍या गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या खेदजनक आणि अविश्वसनीय आहेत.’

ते पुढे म्हणाले की, ‘सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली होती, याचा सुशांतला त्रास झाला, हे संजय राऊत यांचे वक्तव्य पूर्णतः खोटे आहे. या प्रकरणाशी संबंधित दिशाभूल करणारी तथ्ये पसरवणे हा एक सुनियोजित कट आहे. काही लोकांना या प्रकरणाचा छडा लागावा असे वाटत नाही. संजय राऊत हे एक जबाबदार नेते आहेत, त्यांच्याकडून असे वक्यव्य अपेक्षित नाही. तरी त्यांनी 48 तासांमध्ये माफी मागावी.’

पुढे त्यांनी हे देखील सांगितले की, सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते. अशा खोट्या विधानांमुळे सुशांतच्या लाखो चाहत्यांच्या मनावर खोटा आघात झाला आहे. आमदार नीरजकुमार बबलू यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खराब झाली आहे. तरी वकिलांची नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत बेजबाबदार विधानांबद्दल खासदार संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे.’ (हेही वाचा: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह राजपूत याच्याबरोबर झालेल्या व्हॉट्सअप संवादाचे स्क्रीनशॉर्ट केले शेअर)

याबाबत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘जर आपल्याकडून काही चुकले असेल तर आम्ही त्याबद्दल विचार करू. पण यासाठी आधी मला त्यात लक्ष द्यावे लागेल. मी आतापर्यंत जे काही बोललो ते माझ्याकडे असलेल्या माहितीवर आधारित आहे, सुशांतचे कुटुंब त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे बोलत आहेत. याबाबत मी अजून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.’