सुपरमॉडेल इलाक्षी गुप्ता 'तानाजी' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
Supermodel Elakshi Gupta (PC_Instagram)

अलीकडे बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मुलांची वर्णी लागायला सुरुवात झाली आहे. यातील अनेक स्टारकिड्सनी पहिल्याचं चित्रपटात यश मिळवलं आहे. सुपरमॉडेल इलाक्षी गुप्ता (Supermodel Elakshi Gupta) बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याच्या बहुचर्चित 'तानाजी' (Tanhaji Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री (Bollywood Entry) करणार आहे. या चित्रपटात इलाक्षी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात इलाक्षी शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाई मोहिते यांची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर साकारणार आहे. विशेष म्हणजे बोल्ड मॉडेल इलाक्षीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण तानाजीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री काजोल ही तानाजीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान झळकणार आहे. (हेही वाचा - Tanhaji Trailer: अजय देवगण, सैफ अली खान यांच्या दिमाखदार अंदाजातील 'तानाजी' सिनेमाचा ट्रेलर आऊट; पहा मुघलांच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक करणारी लढाई (Watch Video))

इलाक्षीने याअगोदर ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केलं होतं. इलाक्षीने आपल्या कामाच्या जोरावर 2015 मध्ये मिसेस इंडिया ग्लोब ही पदवी मिळवली होती. आता 'तानाजी' चित्रपटात इलाक्षीची भूमिका पाहणे औत्सुक्याची ठरणार आहे.

तानाजी चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटात काजोल- अजय देवगण ही रिअल लाईफ जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तानाजी या सिनेमाच्या माध्यमातून काजोल पहिल्यांदाच मराठमोळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.